शेतकऱ्यांचा खरा डिजिटल मित्र ‘महाविस्तार-AI ॲप’

Spread the love

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ॲप वापर करावा;सरपंच श्रीकांत (कांता) फड यांचं आवहान

परळी वैजनाथ ता.२(प्रतिनिधी)

सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे, तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील दरातील चढ-उतार यांमुळे शेती करणे अधिकच आव्हानात्मक झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार-AI मोबाईल ॲप हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि विश्वासार्ह डिजिटल साधन ठरत आहे. या ॲपचा लाभ परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन दाऊतपुर गावाचे सरपंच श्रीकांत (कांता) फड यांनी केले आहे.
महाविस्तार-AI ॲप शेतकऱ्यांना शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे प्रभावी साधन आहे. पेरणीपूर्व नियोजन, योग्य पीक निवड, खत व पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, काढणी तसेच काढणीनंतरची साठवणूक व विक्रीपर्यंतची सर्व माहिती या एकाच ॲपमध्ये उपलब्ध आहे. रिअल-टाइम हवामान अंदाज, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यांसारख्या घटकांवर आधारित पीक सल्ला मिळत असल्याने शेतकऱ्यांना योग्य वेळी निर्णय घेणे सुलभ होते.योग्य खतांची निवड, अचूक खत व पाणी व्यवस्थापन स्मार्ट सिंचनाबाबत मार्गदर्शन मिळते. कीड व रोग ओळख प्रणाली उपाययोजना, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पीक संरक्षण अधिक प्रभावी ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार तज्ज्ञांकडून मिळणारे मार्गदर्शन, बाजारभावाची अद्ययावत माहिती, विविध पिकांचे दर, पीक विमा योजना, तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची,महाडीबीटीची माहिती व अर्ज करण्याची सुविधाही या ॲपमध्ये देण्यात आली आहे. याशिवाय माहितीपूर्ण व्हिडिओ, शेतीशाळा, हवामान-अनुकूल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, नवीन संशोधन व कृषी क्षेत्रातील नवकल्पनांची माहिती मिळून शेती अधिक आधुनिक व नफेखोर बनवण्यास मदत होत आहे.
ज्ञानाचा साथी म्हणून काम करणारे महाविस्तार-AIॲप शेतकऱ्यांचा खरा डिजिटल मित्र ठरत आहे. त्यामुळे परळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी गूगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन सरपंच श्रीकांत (कांता) फड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page