पाथरी बाजार समितीच्या सभापतींवर अविश्वास ठराव दाखल.!

Spread the love

पाथरीच्या राजकारणात खळबळ;अविश्वास पारीत होणार का याकडे लक्ष

परभणी (प्रतिनिधी):
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा राजकीय भूकंप घडला आहे. मनमानी कारभार, समितीच्या हिताकडे दुर्लक्ष आणि कुटुंबियांना योजनांचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप करत सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. हा ठराव माजी आमदार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे शुक्रवारी (दि. 31) दाखल झाला असून, या घटनेने जिल्हा राजकारणात खळबळ उडाली आहे.

संचालकांनी दाखल केलेल्या या ठरावात नखाते यांनी संचालक मंडळाचा विश्वास गमावला, एकतर्फी निर्णय घेतले, आणि स्वतःच्या कुटुंबियांना लाभ मिळवून दिला असा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. ठरावावर माजी आमदार दुर्राणी व सईद खान गटातील प्रमुख संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या संचालकांमध्ये एकनाथ घांडगे, किरण टाकळकर, संतोष गल्बे, संजीव सत्वधर, गणेश दुगाणे, शेख दस्तगीर शेख हसन, शाम धर्मे, विजयकुमार शिताफळे, अशोक आरबाड, संदीप टेंगसे, आनंद धनले आणि सय्यद गालीब सय्यद इस्माईल यांचा समावेश आहे.

या हालचालींनंतर पाथरी तालुक्यातील राजकारणात नवा रंग भरला असून, नखाते यांची खुर्ची डगमगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बाजार समितीच्या सभापतीपदावर नेमका कोण ताबा घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.राजकीय वर्तुळात या घटनेला “दुर्राणी गटाचा शक्तीप्रदर्शन” मानले जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी या घडामोडींचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत

You cannot copy content of this page