पूर्णा न.प.निवडणुक; प्रारुप मतदारयाद्यांत घोळ;प्रभागातील लोकसंख्या ५२६४,तर मतदार ५२६२-फक्त दोनच मुले दाखवली.!
पूर्णा ता.९(प्रतिनिधी): नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पूर्णा नगरपरिषदेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, या याद्यांमध्ये मोठा गोंधळ समोर आला असून विशेषतः प्रभाग क्रमांक ९ मधील आकडेवारी पाहता अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत.
सदर प्रभागात एकूण लोकसंख्या ५२६४ इतकी आहे, पण मतदारसंख्या तब्बल ५२६२ दाखवण्यात आली आहे. म्हणजेच या भागात फक्त दोनच अल्पवयीन मुले आहेत, असा अर्थ या आकडेवारीतून निघतो. इतकी विसंगत माहिती असल्याने मतदार यादीच्या अचूकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी या प्रभागाचे मधोमध विभाजन करून तीन सदस्यीय प्रभाग करण्यास अनेक नागरिकांनी आक्षेप घेतले होते. उपविभागीय अधिकारी गंगाखेड येथे याबाबत सुनावणीही झाली होती, पण सर्व आक्षेपांना केराची टोपली दाखवण्यात आली. आता त्याच प्रभागात मतदारसंख्येतील हा विचित्र तफावत उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक ९ मध्ये शहरातील इतर भागांतील मतदारांची नावे चुकीने समाविष्ट करण्यात आली आहेत. काही मतदारांच्या नावात मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्यामुळे या प्रभागातील खरी रहिवासी मतदार मंडळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रकारामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नगर परिषदेकडून झालेल्या या चुका नेमक्या कशामुळे घडल्या, याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. या याद्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला का? असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.आता जिल्हा निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक ९ मधील मतदार तसेच शहरातील नागरिकांकडून होत आहे.निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होतील का? याकडे पूर्णा शहराचे लक्ष लागले आहे.












