पूर्णा रेल्वे स्थानक बनले खाजगी ट्रॅव्हल्सचे वाहनतळ..?
रेल्वे स्थानक परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी; रेल्वे सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष..
पूर्णा/प्रतिनिधी
येथिल रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर बस्तान मांडून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या व्यवसायींका पाठोपाठ आता शहरातील खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपला मोर्चा स्थानक परिसरातकडे वळवला आहे.येथिल स्थानका बाहेरील रेल्वेच्या जागेला आपल्या ट्रॅव्हल्सचे वाहनतळ बनवल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे.याकडे रेल्वे सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर केले नाही ना असा सवाल आता उपस्थित होत आहे.पूर्णा रेल्वे स्थानक सुरक्षेच्या दृष्टीने वारंवार चर्चेत असते.येथिल स्थानक व रेल्वेची साधन संपत्तीचा सांभाळ करण्यासाठी रेल्वेच्या वतीने रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणे देखील निर्माण केले आहे.रेल्वे सुरक्षा विभागात निरीक्षक अधीका-यांसह सहा निरीक्षक या सोबतच ३० ते ४० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.असे असतानाही मात्र केवळ रेल्वे सुरक्षा बलाच्या अधीका-यांनी सुरू केलेल्या चालढकल पणामुळे व गस्त नसल्याने रेल्वे स्थानक परिसरातून रेल्वेचे साहित्य चोरी जाणे, परिसरात स्थानकावर प्रवाशांना लुटणे, हाणामारीचा प्रत्यय वारंवार येत आहे.मागील काही दिवसांपासून तर रेल्वे स्थानक परिसरात खाजगी व्यवसायीकांनी अगदीच उच्छाद मांडला आहे.रेल्वेच्या परिसरात हाँटेल, पानटप-या,आणी आता तर खाजगी वाहनांचे वाहनतळही सुरू झाले आहे.स्थानकाच्या प्रवेशद्वाराला देखील काही हातगाडे,हाकर्सचे दुकाने ,पानटपरी चालकांनी विळखा घातला आहे.स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ४ बाहेरील रेल्वेच्या जागेत खाजगी ट्रॅव्हल्स चालक दिवसरात्र आपली वाहने विनापरवाना उभी करत आहेत.त्यांनी येथे एक प्रकारे वाहनतळच निर्माण केले आहे.येथिल रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे स्थानक व धावत्या रेल्वेमध्ये अनाधिकृत हाकर्स फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणात विनापरवाना दर्जाहीन खाद्य पदार्थ विक्री केली जात आहे.यासर्व गोष्टींचा प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.येथील प्रशासनाने स्थानक परिसरात गस्त ठेवून सदरील प्रकाराला आळा घातला पाहिजे परंतु येथिल रेल्वे सुरक्षा बलातील कर्मचारी रेल्वे स्थानकांसह परिसरातही गस्त घालीत नसल्याने परिसरात हा प्रकार बोळकावत चालला आहे.आता याकडे रेल्वे विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन पूर्णेत सुरू असलेल्या प्रकारात आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.