पुर्णेत ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा

पूर्णा ता.३ (प्रतिनिधी) :
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त पूर्णा शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पंढरीनाथ शिंदे, नायब तहसीलदार पूर्णा यांच्या हस्ते पंचशील धम्मद्वजाचे ध्वजारोहण झाले. त्यानंतर उपस्थित उपासक-उपासिकांना पूज्य भदंत पय्यावंस यांनी त्रिशरण व पंचशील दिले.
द्वितीय सत्रामध्ये बुद्ध विहार, भदंत उपाली थेरो नगर पूर्णा येथून तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक नवा मोंढा, आनंदनगर चौक, महावीर चौक, बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचली. येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
सभेच्या प्रारंभी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास इंजिनीयर भीमराव हटकर (सेवानिवृत्त अभियंता, नांदेड), अशोक कांबळे (जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, परभणी), रिपाई नेते प्रकाश कांबळे, प्रा. डॉ. मोहनराव मोरे (अध्यक्ष), उत्तमभैया खंदारे, दादाराव पंडित, अॅड. हर्षवर्धन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात भदंत पय्यावंस यांनी त्रिशरण पंचशील दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांचा उहापोह केला. त्यांनी सांगितले की, मुला-मुलींना उच्च व दर्जेदार शिक्षण द्या, त्यांच्यावर धम्माचे संस्कार रुजवा आणि प्रज्ञा-शील-करुणा या तत्वांनुसार जीवन जगावे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक इंजि हाटकर यांनी बोलताना सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवक्रांतीचा इतिहास विशद केला. त्यांनी धम्म स्वीकारण्यामागची पार्श्वभूमी सांगताना नमूद केले की बुद्ध धम्म हा विज्ञानाधारित असून प्रज्ञा, शील, करुणा, मंगल, मैत्री, दानपरमिता, समता, स्वातंत्र्य व विश्वबंधुत्व या तत्वांवर आधारित आहे. त्यामुळे संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याची ताकद बुद्ध विचार प्रणालीमध्ये आहे. तसेच पाली भाषेचे महत्त्व विशद करताना, ही अभिजात भाषा असून तिच्या वाङ्मयातून मानवी मन सुसंस्कृत होते. म्हणून शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर पाली विषयाला व्यापक स्थान मिळाले पाहिजे, असेही मत व्यक्त करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व सहका-यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
या प्रसंगी पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मिरवणुकीस व सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने पूर्णा शहर धम्ममय वातावरणाने भारावून गेले होते.