पूर्णा गॅस एजन्सीकडून ग्राहकांची सर्रास लूट?; प्रशासनाची चुप्पी

Spread the love

घरपोच सिलेंडरसाठी ३० ते ५० रुपयांची सक्ती; अ.भा. ग्राहक पंचायतीची चौकशीची मागणी

पूर्णा, ता. ११ (प्रतिनिधी) : पूर्णा शहरासह तालुक्यातील गॅस ग्राहकांकडून घरपोच सिलेंडर देण्याच्या नावाखाली ३० ते ५० रुपये अतिरिक्त रक्कम वसूल केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गॅस एजन्सी व डिलिव्हरी कर्मचाऱ्यां कडून सुरू असलेल्या या कथित प्रकारा कडे प्रशासन आणि संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याची नाराजी नागरिकां कडून व्यक्त केली जात आहे.

पूर्णा शहरातील एकमेव गॅस एजन्सीमार्फत हजारो ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. मात्र, सिलेंडर वितरणाच्या वेळी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडून निर्धारित दरापेक्षा ३० ते ५० रुपये अधिक रक्कम “डिलिव्हरी चार्ज” म्हणून मागितली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ही अतिरिक्त रक्कम देण्यास ग्राहकांनी नकार दिल्यास सिलेंडर देण्यास टाळाटाळ करणे अथवा वाद घालण्याचे प्रकार घडत असल्याचेही समोर आले आहे.

तेल कंपन्यांनी घरपोच गॅस सेवा देताना स्पष्ट नियम व अटी निश्चित केलेल्या असतानाही त्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सिलेंडर वितरित करताना ग्राहकांसमोर वजन तपासले जात नसल्याचीही तक्रार आहे. अनेक डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडे वजनकाटा नसतो तसेच ग्राहकांना योग्य बिल किंवा पावतीही दिली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शासनाच्या नियमांनुसार डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी ड्रेस कोड व ओळखपत्र धारण करणे बंधनकारक असताना अनेक जण कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राशिवाय गॅस वितरण करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. हा प्रकार शहरात उघडपणे सुरू असताना पुरवठा विभाग आणि संबंधित तेल कंपन्या याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एजन्सीकडून मोबदला मिळत नसल्याचा डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा दावा

दरम्यान, याबाबत एका डिलिव्हरी कर्मचाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, गॅस एजन्सीकडून घरपोच सेवा देण्यासाठी कोणताही ठोस मोबदला दिला जात नाही. नियमित पगार नसल्यामुळेच ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम मागावी लागते. एजन्सी चालकाने कामाचा योग्य मोबदला दिल्यास ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे मागण्याची वेळ येणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

गॅस एजन्सीवर कठोर कारवाईची मागणी

पूर्णा शहर व तालुक्यातील गॅस एजन्सींची तात्काळ चौकशी करून ग्राहकांकडून अवैध वसुली करणाऱ्या एजन्सी व डिलिव्हरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अतिरिक्त पैसे देऊ नयेत यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठोस कारवाई करावी, असे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले आहे.या निवेदनावर तालुकाध्यक्ष जनार्दन आवरगंड, महिला तालुकाध्यक्ष सौ. सुनिता सोनवणे, तालुका संघटक शिवाजी शिराळे, शहराध्यक्ष स. सलीम मुनसब, शहर संघटक सुशील गायकवाड, कोषाध्यक्ष संजय पांचाळ, सदस्य मनोज भुजबळ आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page