सन्मान नारीशक्तीचा’ उपक्रमाने महिलांचा गौरव आ. डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुनिल जाधव दांपत्याचा सामाजिक उपक्रम
पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी)
परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आ. डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सन्मान नारीशक्तीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात महिलांना साडी–चोळी वाटप तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता हरिनगर पंचशील नगर परिसरात पार पडणार आहे.हा उपक्रम समाजसेवक व नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुनिल लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ. अनिताताई सुनिल जाधव यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
सामाजिक, धार्मिक आणि लोकसेवेच्या कार्यात सातत्याने अग्रेसर राहणाऱ्या या दांपत्याने मागील काळात अनेक उपक्रम राबविले आहेत.नुकतेच त्यांनी टायगर ग्रुप महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप व एशियन व्हेस्कुलर हॉस्पिटल (हैदराबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल ४५० रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे पाठविण्यात आले होते.
तसेच नवरात्रोत्सवात श्री साई छत्र नवरात्र समिती आणि श्री दुर्गामाता नवरात्र महोत्सव समिती यांच्या माध्यमातून महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
या सामाजिक कार्यांच्या धाग्यात सातत्य राखत जाधव दांपत्याने पुन्हा एकदा महिलांच्या सन्मानासाठी पुढाकार घेतला आहे. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या ‘नारीशक्ती सन्मान सोहळ्या’ला परिसरातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुनिल जाधव व सौ. अनिताताई जाधव यांनी केले आहे.












