सोयाबीनचा उठाव होईना; कवडीमोल भावाने खरेदी-विक्री
पूर्णेतील शेतकऱी,व्यापारी हवालदिल; थेट खरीदारांमुळे डोकेदुखी वाढली..
पूर्णा/प्रतिनिधी
यंदाच्या मोसमात नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. पणन महासंघाने बाजार पेठा वगळून काही व्यापा-यांना दिलेल्या परवान्याचा फटका शेतकऱ्यांसह मार्केट यार्डातील व्यापा-यांनाही बसत आहे.थेट खरीददारी परवानाधारकांवर कोणाचाही अंकुश नसल्याने सोयाबीन कवडीमोल भावाने खरेदी- विक्री केली जात आहे.परिणामी बाजार समीतीतील सोयाबीनचा उठाव ठप्प झाला आहे.त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल नाममात्र ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रूपयांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी हवालदिल झाले आहेत.
एकीकडे काही दिवसांपासून सोयाबीन तेलचे दर गगनाला भिडले आहेत.बाजारात नव्या सोयाबीनची आवक प्रतिदिन ५ ते ७ हजार क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असतानाही दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मात्र प्रति क्विंटल ४२०० रूपयांपेक्षा कमी दर मिळत आहे. समाधानकारक दर मिळत नसल्याने व्यापा-यासह शेतकरीही धास्तावले आहेत. त्यातच पणन मंडळाने परिसरात काही खाजगी व्यापाऱ्यांना थेट शेतमाल खरेदीचे परवाने देऊ केले आहेत.त्या व्यापा-यांवर अंकुश ठेवण्यासाठी बाजार समिती नव्हे तर सहकार खात्याचे उपनिबंधक, निबंधक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.मात्र या विभागाकडून त्या खरीददारांवर कोणताही अंकुश नसल्याने ते शेतकऱ्यांच्या माल कवडीमोल दराने खरेदी करत आहेत. शिवाय खरेदी केलेल्या मालाचा शासनाचा मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चुना लावण्याचे काम ते करत आहेत.परिणामी त्याचा फटका बाजार समीतीत अंतर्गत येणाऱ्या व्यापा-यांसह शेतकऱ्यांना बसत आहे.सोयाबीनचे भाव पडल्याने मार्केट यार्डात जवळपास ३० ते ४० बॅग सोयाबीन विक्री विना पडून आहे.मालाचा योग्य दराने उठाव नसल्याने सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या बिछाईतदार शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होत आहे.आठ दिवसां वर येऊन ठेपलेल्या दिवाळसणांवर यांचा परिणाम दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.
——————————–सहकार खात्याचे उपनिबंधकांचे दुर्लक्ष…?
पणन महासंघाने मार्केट यार्ड बाहेरील भुसार दुकानदारांना थेट खरिददारीचा परवाना दिला आहे.त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सहकार उपनिबंधकांची नियुक्ती केली आहे.थेट खरेदीदारांनी सोयाबीनचे भाव पाडून सोयाबीनची कवडीमोल दराने खरेदी सुरू केली आहे.हजारों क्विटल मालाची खरेदी करुनही त्यांच्या व्यवहाराची नोंद उपनिबंधक घेत नाहीत त्यामुळे शासनाचा लाखो रुपये महसूल तर बुडतच आहे परंतु थेट खरीदारांनी चालवलेल्या मनमानीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.सोयाबीनच्या मालाला समाधान कारक भाव मिळत नसल्याने शेतकरी संतापले आहेत.
सहकार उपनिबंधकांनी या खरीददारांवर अंकुश ठेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
थेट खरेदीदारांना बाजार समीती यार्डात व्यवसायसाठी बंधनकारक करावे- डॉ. मोदाणी
बाजार समीत्या अंतर्गत कायदेशीरपणे शेतीमाल खरेदी करणाऱ्या कमिशन एजंट, आडत दुकानदारांना
शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका बसत आहे.सहकार व पणन मंडळाव्दारे मार्केट कमिटी यार्डा बाहेर भुसार दुकानदारास थेट शेतमाल खरेदीचे परवाने देवून आडत दुकानदारीवर गडांतर आणले आहे. कायदेशीरपणे शेतीमाल खरेदी करणाऱ्या कमिशन एजंट, वाचवायचे असेल तर बाहेरील भुसार थेट खरेदीदाराचे परवाने रद्द करुन त्यांना मार्केट कमिटी अंतर्गत व्यवसाय करायला लावा.अन्यथा याविरोधात व्यापारी आंदोलन करणार आहेत.
- डॉ.जयप्रकाश मोदाणी
अध्यक्ष ,पूर्णा आडत व्यापारी असो.
संचालक कृ.उ.बा.समीती पूर्णा