अनधिकृत बोअरवेल खोदण्याचा सपाटा; प्रशासनाकडून कारवाई होणार काय…?
पूर्णा शहर तालुक्यातील चित्र;पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष; पालिकेसह ग्रामपंचायतींचाही कानाडोळा
पूर्णा/प्रतिनिधी
पर्यावरण विभागासह पालिका ग्रामपंचायतींनी व कानाडोळा केल्याने शहरासह तालुक्यात विनापरवाना बोअरवेल खोदण्याचा सपाटाच सुरु आहे. त्यामुळे जमीनीची अक्षरशः चाळणी होऊन पर्यावरणाचाही मोठा -हास होत आहे. त्यामुळे हा प्रकार स्थानिक रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी जनतेतून होत आहे.
बोअरवेल खोदण्यासाठी परराज्यातून भाडेतत्त्वावर मशीन आणून कमिशनपोटी अनेकांनी अनधिकृत खोदकाम सुरू केले आहे. मागील काही वर्षांत जमीनीतील पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने ३५० ते ४०० फुटापर्यंत जमिनीत बोअर करण्यात येत आहे. पर्यावरण विभागाच्या नियमांची पायमल्ली होत असतानाही शहरासह तालुक्यातील यंत्रणा मात्र साफ दुर्लक्ष करीत आहे. शासन आदेशानुसार विनापरवाना तसेच मर्यादेपेक्षा अधिक खोलवर बोअर करणे गुन्हा आहे. सध्या, नुकताच पावसाळा संपला आहे. दस- यापासुनच कमीशन एजंटांनी परराज्यातील बोअरवेल मशीन बोलावून घेतले आहेत. उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी अनेक जणांनी बोअरवेल घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून उमेदवारांकडून मतदारांना बोअर मारून देण्याचे प्रलोभन दाखविण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोअरवेल मशीन निवडणूक आयोगाच्या रडारवर राहणार आहेत की नाही हेही एक कोडं आहे. निवडणूक होईपर्यंत किमान या प्रकारावर पायांबद घालण्याची मागणी होत आहे. त्याच प्रमाणे रस्त्याची वजन भार मर्यादा तेवढीच महत्वाची आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची बोअरवेल मशीनच्या रहदारीने चाळणी होत आहे. एरवी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून ओव्हरलोड वाहनांवर दंड ठोठावण्यात येतो. परंतु बोअरवेल वाहनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या गैरप्रकाराबाबत स्थानिक ग्रामपंचायती आणि पूर्णा नगरपालिकाही दुर्लक्ष करीत आहे. विनापरवाना बोअरवेलचा आडोसा घेऊन मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल लपविली जात आहे. निवडणूक काळात परराज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांच्या माध्यमातून तालुक्यात अनधिकृत रित्या पैसा पसरविला जात असल्याची शंका आहे. अनेक गावांमधील बोअरवेल एजंटच्या हालचाली बघता हा संशय अधिक बळावत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमीकडून होत आहे.
——————————–
——————————- फौजदारी गुन्हा दाखल करावा..!
शहर व परिसरात विनापरवानगी ३०० ते ४०० बोअरवेल घेतले जात आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल ठासाळत आहे. शिवाय पूर्णा शहरात पालीका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही महाभागांनी आपल्या जागा सोडून चक्क सरकारी रस्त्यावर बोअरवेल खोदकाम केलेले आहे.तर अनेकांनी पालीकेचे बोअरवेल हायजॅक केले आहेत. विनापरवाना बोअरवेल खोदणे, रस्त्यावर बोअरवेल खोदणे, हायजॅक केलेल्या बोअरवेल हातपंप पुन्हा ताब्यात घेऊन असे प्रकार करणाऱ्यावर पालीकेच्या वतीने फौजदारी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.











