राष्ट्रवादी(शरद पवार)गटाच्या मा.आ.घनदाटांना वंचितची उमेदवारी..
परभणी जिल्हा;गंगाखेड विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीची शक्यता
पूर्णा/ प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीने जोरदार धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नाराज नेते माजी आ.सितारामजी घनदाट यांना गळाला लावले आहे.त्यांना वंचितची उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे मविआची डोकेदुखी वाढली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजले महायुती, महाविकास आघाडीतील विविध पक्ष निवडणूकीसाठी जोमाने कामाला लागले आहेत.परभणी जिल्ह्यातील बहुचर्चित गंगाखेड मतदार संघात राजकारण तापले आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बुधवारी २३ रोजी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली.यात शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.यानंतर मविआकडून गंगाखेड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प)पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मा.आ.सितारामजी घनदाट हे नाराज झाले होते.त्यांनी गुरुवारी २४ सकाळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचितकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.आंबेडकरांनीही गंगाखेडची उमेदवारी मा.आ.घनदाट यांना जाहीर केली आहे.आता गंगाखेड मतदार संघात विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे मविआचे उमेदवार विशाल कदम,आणी वंचित बहुजन आघाडीचे सितारामजी घनदाट अशी तुल्यबळ निवडणूक पहावयास मिळणार आहे.तिसरी आघाडी,जरांगे पाटील यांच्यासह मनसे,एएम आय एम,बसपा,मनसे या पक्षाचे उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाहीत त्यामुळे आता घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. पूर्णा येथे मा.आ.सितारामजी घनदाट यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर कार्यकत्यांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.