स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्या साठी १६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे
पुर्णा /प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब भारतरत्न आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु वेळेत अर्ज सादर करता न आल्याने या योजनेसाठी आगामी १६ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त गीता गुटे यांनी दिली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जेविद्यार्थी शासकीय वस्तीगृहात प्रवेशास पात्र असून वसतीगृहात प्रवेश मिळालेले नाही, अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे या मुदतवाढीचा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपला अर्ज ऑनलाईन करून सदरील अर्जाची प्रत समाज कल्याण कार्यालयात आणुन द्यावे, असे स्वाधार विभाग प्रमुख नागेश गिराम व समाज कल्याणसहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी केले.