भागवत कथा जीवनात उतरली पाहिजे- पंडित अतुल शास्त्री भगरे
श्रीक्षेत्र धनगर टाकळीत भागवत कथा सप्ताह व यज्ञास आजपासून सुरुवात.
पूर्णा(प्रतिनिधी),,
जीवनाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्व प्रथम स्वतः मध्ये बदल घडवून आणला पाहिजे.त्यादृष्टीने भावभक्ती,अहंकारमुक्ती, बासरीस्वरूप मधुरता इत्यादीं वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारा श्रीमद् भागवत ग्रंथ मार्गदर्शक होय,असे प्रतिपादन ख्यातनाम भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी आज (दि.7 जानेवारी 2025,मंगळवार रोजी) श्री क्षेत्र धनगर टाकळी येथे भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या प्रारंभी केले.
श्री सद्गुरू दाजी महाराज संस्थान, सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान, संतवर्य योगीराज गंगाजीबापू गोसेवा प्रकल्प,श्रीदाजीमहाराज सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने दाजी महाराज यांचा 165 वा जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलाचा रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे,त्यात आज भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सुरू झाला यावेळी श्री भगरे गुरुजी निरूपण करीत होते.
कथेच्या प्रारंभी त्यांनी भागवत कथेचे महत्त्व विषद केले .केवळ कथा ऐकून चालत नाही तर ती कथा जीवनात उतरली पाहिजे.बासरीचे रूपक सार्थकतेने देत उक्ती व कृतीचे ऐक्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान,आज महोत्सवातील पंच कुंडात्मक श्री लक्ष्मी नारायण यज्ञास विधिवत प्रारंभ झाला.वैदिक मंत्रघोषात अग्निमंथन झाले. श्री गणेश यागात यजमान मोठ्या संख्येने सहभागी झाले.
याशिवाय सकाळच्या सत्रात लक्षदुर्वाचन सोहळ्यात महिला – पुरुष भाविक सहभागी झाले.
दि.2 जानेवारीपासून सुरू असलेल्या ऋग्वेद संहिता,पद क्रम षडंगसहित पारायण सांगता प्रसंगी सर्व सहभागी वैदिकांचा श्री. भगरे गुरुजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. घन पारायण कर्ते वेदमूर्ती अभिनव जोशी (हैदराबाद), वेदमूर्ती विद्यासागर देव (वाराणसी), वेदमूर्ती मनोज जोगळेकर(पुणे), वेदमूर्ती विजयेश सहकारी (गोवा), वेदमूर्ती निखिल जोशी(जिंतूर), वल्लभ मुंडले (सिंधूदुर्ग) यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी वैदिक प्रतिनिधी सिध्दांत जोशी व वेदमूर्ती उमेश महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी यजमान विधीज्ञ प्रमोद कुलकर्णी व सौ.विद्या कुलकर्णी हे दांपत्य यासह संस्थानाधिपती वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर उपस्थित होते.सुत्रसंचालन व प्रास्ताविक वेदमूर्ती अवधूत महाराज टाकळीकर व डॉ.हरिभाऊ पाटील यांनी केले.