पंचायत समिती निवडणुकीसाठी पूर्णा तालुक्यातील १२ गणांचे आरक्षण जाहीर

Spread the love

पूर्णा (ता.१३)प्रतिनिधी: पूर्णा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या बारा गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज तहसील कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत आज सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी पार पडली.

या सोडतीस राजकीय, सामाजिक पक्ष, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्णा तालुक्यात आगामी काही महिन्यांत होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे. प्रभाग याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीद्वारे निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे.

घोषित आरक्षणानुसार —

  • महिला प्रवर्गासाठी : एरंडेश्वर, आहेरवाडी, देऊळगाव (दु.), कावलगाव, धानोरा मोत्या हे गट राखीव.
  • अनुसूचित जाती प्रवर्गासाठी : चुडावा आणि ताडकळस हे गट राखीव.
  • नागरी मागास प्रवर्गासाठी : देगाव, कावलगाव आणि धानोरा मोत्या हे गट राखीव.
  • सर्वसाधारण प्रवर्गात (खुला) : गौर, धनगर टाकळी, फुलकळस आणि वशुर हे गट समाविष्ट.

या सोडतीमुळे स्थानिक राजकारणात चुरस निर्माण झाली असून, महिला व मागास प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रचार नियोजनास सुरुवात केली आहे.सोडत कार्यक्रमात ईश्वर चिठ्ठी काढण्याचा सन्मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील बालक संम्यक बिंबीसार दवणे याला मिळाला. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे, महसूल सहाय्यक व्यंकटेश जज्जरवार, उज्वला पुल्लेवार, रेखा जोंधळे (शृंगारपुतळे मॅडम) आदींची उपस्थिती होती.संपूर्ण सोडत कार्यक्रम शांततेत, पारदर्शक वातावरणात पार पडला. या सोडतीनंतर पंचायत समिती निवडणुकीचा रंग अधिक गडद झाला असून, राजकीय समीकरणे नव्याने जुळताना दिसत आहेत.

You cannot copy content of this page