पुर्णा नदीच्या पुरात अडकलेल्या २२ वानरांची यशस्वी सुटका.

Spread the love

महसूल विभाग,अग्निशमन दल, वनविभाग आणि ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश.

पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) :
तालुक्यातील मौजे ममदापूर शिवारात पुर्णा नदीच्या पुरामुळे अडकलेल्या वानरांच्या टोळीला अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. महसूल विभाग, नगरपरिषद अग्निशमन दल, वनविभाग तसेच स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल २२ वानरांची सुटका सोमवार सायंकाळी (ता.२४) करण्यात आली. मागील २४ तासांहून अधिक काळ हे वानर नदीपात्रात अडकून होती.गोदावरीच्या बॅक वॉटरमुळे पुर्णा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाचा तत्पर प्रतिसाद

या बचाव मोहिमेचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर आणि तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी केले. त्यांच्या देखरेखीखाली महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. स्थानिक स्तरावर मंडळ अधिकारी सुदाम खुणे, ग्राम महसूल अधिकारी आर.आर. सिंगरवाड, पी.बी. कुलकर्णी तसेच पोलीस पाटील विनींता काळबांडे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

तरुणांचा धाडसी सहभाग

ग्रामस्थ व शेतकरी तरुणांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्यात सहभाग घेतला. केशव काळबांडे, शांतीराम डूकरे, वशिष्ठ काळबांडे, मुंजा शिंदे या तरुणांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून मदत केली.

विभागांचा समन्वय ठरला निर्णायक

वनविभागाच्या वतीने राम खटिंग, तर नगरपरिषदेकडून गणेश रापतवार, अमजद कुरेशी, सोनाजी खिल्लारे, दीपक गवळी, राजेश चावरिया यांनी सक्रीय सहभाग घेतला. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ बोट उपलब्ध करून दिली. त्यावरील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालून वानरांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.

सतर्कतेचे आवाहन

या मोहिमेत प्रशासन आणि ग्रामस्थांचा उत्तम समन्वय दिसून आला. नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती तीव्र होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षित स्थळी हलावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


You cannot copy content of this page