पूर्णा-थूना नदीच्या पुरात शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास;प्रशासनाचे दुर्लक्ष
थुना नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची गरज
पूर्णा (ता. २८, प्रतिनिधी)
शहरालगत वाहणाऱ्या पूर्णा आणि थूना नद्यांच्या मधोमध पुर्णेतील शेतकऱ्यांची ५०० ते ६०० हेक्टराहुन अधिक क्षेत्रावर शेती असून दीड ते दोन हजार जनावरे येथे सध्या बांधलेली आहेत. मागील ८ ते १५ दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही नद्यांना प्रचंड पूर आला आहे. जायकवाडी धरणातून तब्बल २ लाख २६ हजार क्युसेक तर येलदरी जलाशयातून ८८ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

भवानी मंदिर परिसरातून माटेगाव व कौडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी साचले आहे. परिणामी मधोमध अडकलेल्या शेतजमिनींवर पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

शेकडो एकर शेतीतील १ ते १.५ हजार जनावरे चारा, पाणी व दुधासाठी हाक मारत असताना शेतकरी चिखल, खोल पाणी व पुराच्या लाटांवर मात करीत शेतापर्यंत पोहोचत आहेत.(ता.२८) रोजी रविवारी सायं पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास करताना काही शेतकरी दिसुन आले.तर शेतकऱ्यांचे दोन जनावरे पाण्यात दगावल्याची माहिती आहे.दरवर्षी येणाऱ्या या भीषण समस्येचे मुख्य कारण म्हणजे थूना नदीवरील पुलाची कमी उंची. पूरकाळात नदीच्या पाण्याखाली हा पूल गेला की शेतकऱ्यांचा रस्ता बंद होतो. मग शेतकरी हायतनगर, झिरोफाटा, कातनेश्वर किंवा ताडकळस-परभणीमार्गे वळसा घालून, तर कधी पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून शेतांपर्यंत पोहोचतात.

शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी सरळ व स्पष्ट आहे.
थूना नदीवरील पुलाची उंची तातडीने वाढवावी. अन्यथा कधीकाळी दोन्ही नद्यांच्या येणाऱ्या महापुरात शेतमाल, जनावरेच नव्हे तर शेतकऱ्यांचे जीव वाहून जाण्याचा गंभीर धोका आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही मागणी मात्र शासनाच्या कानावर पडतच नाही.आज परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ शेतीच्या नुकसानीपुरता मर्यादित नसून त्यांच्या अस्तित्वाशी निगडित झाला आहे. “दरवर्षी आम्हाला असेच पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. प्रशासन केवळ पुराचा आढावा घेतं; पण आमच्या अडचणींसाठी उपाययोजना करत नाही. आम्हाला वालीच उरला नाही का?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
या भागातील शेतकरी केवळ निसर्गाशीच नव्हे तर शासनाच्या उदासीनतेशी देखील लढत आहेत. जर तातडीने उपाययोजना झाली नाही, तर पूर्णा-थूना नदीपात्रातील शेतकऱ्यांच्या जिवनावर व उपजीविकेवर घोंगावणारा हा धोका एका दिवसात मोठ्या शोकांतिकेत परिवर्तीत होऊ शकतो.












