पुर्णा-थुना नदीच्या पुरात अडकलेले ४ मजूर अखेर सुखरूप बाहेर;१५ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

Spread the love

स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नगरपालिकेच्या बचाव पथकाची संयुक्त कारवाई

पूर्णा, ता.१३ (प्रतिनिधी) : Purna,Thuna River Rescue operation News पूर्णा तालुक्यातील मौजे कौडगांव तसेच पुर्णा शिवारातून वाहणाऱ्या थुना व पुर्णा नदीला पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. धोक्याची पातळी ओलांडून वेगाने वाहणाऱ्या या नद्यांच्या मध्यभागी, समृद्धी महामार्गाला जोडल्या जाणाऱ्या जालना-नांदेड कॅरिडॉर रस्त्याच्या कामावर कार्यरत असलेले ४ परप्रांतीय कामगार गुरुवारी (दि.१२) सायंकाळपासून अडकले होते.

घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार प्रशांत थारकर तसेच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासन व पोलीस दलाकडून तातडीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. मात्र पाण्याचा प्रचंड वेग आणि खोलीमुळे प्रयत्नांना सुरुवातीला यश मिळाले नाही. तब्बल १५ तासांपासून पुराच्या पाण्यात जीव मुठीत धरून बसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी अखेर शनिवारी सकाळी निर्णायक कारवाई करण्यात आली.

पूर्णा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान गणेश रापतवार, अमजद कुरेशी, सोनाजी खिल्लारे, दीपक गवळी व शेर शु यांच्या बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने थरारक मोहीम राबवली. यामध्ये अडकलेले कामगार विक्की सिंग लक्ष्मण सिंग, सलाउद्दीन सिद्दिकी, शिवकुमार व सदाकत अली यांना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.या धाडसी मोहिमेमुळे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या बचाव पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. १५ तासांच्या थरारानंतर मजुरांची झालेली सुटका हा दिलासा देणारा क्षण ठरला.

You cannot copy content of this page