वालूर परिसरात सशस्त्र दरोडा; युवक ठार, सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Spread the love

सेलू, ता. २३ (प्रतिनिधी): सेलू तालुक्यातील वालूर परिसरात बुधवारी (दि.२२) रात्री एक वाजता सुमारास अज्ञात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात संतोष आसाराम सोनवणे (वय २३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एका महिलेला मारहाण करून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेलु तालुक्यातील वालूर शिवारातील एका शेतीआखाड्यावर बुधवारी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून वच्छालाबाई सोनवणे यांच्या अंगावरील अंदाजे ३० ते ५० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या आखाड्यावर चोरट्यांनी पुन्हा हल्ला केला. त्या ठिकाणी झोपलेल्या संतोष आसाराम सोनवणे या तरुणावर चोरट्यांनी गज आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर आणि मानेवर झालेल्या गंभीर जखमेमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

दरम्यान, याच सुमारास वालूरजवळील बोरी रोडवरील श्रीकृष्ण मंदिरात देखील चोरट्यांनी धाड टाकून वृद्ध दत्तात्रेय भोकरे आणि सरूबाई भोकरे यांना मारहाण केली. या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सलग दोन हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्री बाहेर झोपण्यास लोक घाबरत आहेत.

घटनेची माहिती मिळताच परभणीचे पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेसी, उपविभागीय अधिकारी जीवन बेनिवाल, सेलू पोलिस निरीक्षक दिपक वाघमारे आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेकानंद पाटील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. तथापि, आरोपींचा कोणताही ठोस मागमूस पोलिसांना अद्याप लागलेला नाही.या प्रकरणी मयत संतोष यांचे वडील आसाराम रानबा सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ५ ते ६ चोरट्यांविरुद्ध खुनाचा आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिपक बोरसे करीत आहेत. पोलिसांनी श्वानपथक आणि गुन्हे शाखेच्या मदतीने तपास सुरू केला असला तरी आरोपी फरार आहेत.दरम्यान, या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला असून पोलिसांच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वालूर परिसरात लहानमोठ्या चोरीच्या घटना घडत असूनही पोलिसांनी पुरेशी गस्त लावली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांचा प्रश्न आहे की, “घटना घडल्यानंतरच पोलिस जागे का होतात?”

मयत संतोष सोनवणे यांचा गुरुवारी सकाळी माळी गल्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. अंत्ययात्रेला शेकडो नागरिक उपस्थित होते. गावात शोककळा पसरली होती. संतोषच्या अकाली मृत्यूने संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांनी पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page