शार्टसर्किटमुळे चहाचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी..?
पूर्णेच्या बाजारपेठेतील घटना;लाखोंचे नुकसान; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
पूर्णा(प्रतिनिधी)
शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेतील एका चहाच्या बंद दुकानाला बाजुला सोमवारी २८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले असून,घटनेत दुकानातील सर्व साहित्य जळून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीचे कारण अस्पष्ट असले तरी सदरील आग ही शार्टसर्किटमुळेच लागल्याचे बोलले जात आहे.घटनास्थळी एका बाजूला जनरल स्टोअर्स तर दुसऱ्या बाजूला दवाखाना होता तर रस्त्यावर ब-यापैकी वर्दळ होती.मात्र सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.अग्नीशामन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
पूर्णा शहरातील कमाल टाॅकीज ते बसस्टँड रोडवर एटीएमच्या अगदी समोरासमोर ग्रॅज्युएट चहाचे दुकान आहे.सोमवार आवडी बाजारचा दिवस असल्याने दिवसभर दुकानदाराने व्यापार करुन रात्री साडे आठच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान ९ वाजण्याच्या सुमारास दुकानातुन धुराचे लोट बाहेर पडत असताना काही नागरिकांनी पाहिले. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी वेळी काही जागरूक नागरिकांनी वेळ न दवडता पूर्णा पालीकेच्या अग्निशमन दलासह पोलीस , तसेच महावितरण कंपनीला घटनेची माहिती दिली.माहीती मिळताच घटनास्थळी पो.नि. विलास गोबाडे,पोकाॅ.लांडगेवाड तसेच महावितरणचे पांडुरंग चिमटे,तानाजी जोगदंड, शेख एजाज सह अग्नीशामन दलाचे प्रमुख गणेश रापतवार,अमजद कुरेशी,दिपक गवळी, सोनाजी खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आग विझवण्यासाठी हालचाल सुरू केल्या. दरम्यान महावितरण कंपनीने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शहरातील विज पुरवठा खंडित केला.अवघ्या काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.चहाच्या दुकानात गॅस सिलिंडर होते मात्र सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.घटनेत दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.