पूर्णा नगरपरिषदेत मतदारयाद्यांचा गोंधळ चव्हाट्यावर, तक्रारी, आक्षेप अर्जांचा पाऊस- मा.नगरसेवक सुनील जाधव यांचे प्रशासनाला निवेदन

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी): नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असली, तरी पूर्णा नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमुळे शहरात मोठा गोंधळ उडाला आहे. याद्यांतील गंभीर विसंगती, नावांची चुकीची नोंद, आणि इतर प्रभागातील मतदारांची नावे गैरप्रभागात दाखवल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.याद्यांच्या प्रकाशनानंतर आक्षेप अर्जांचा अक्षरशः पाऊस पडत असून, हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मतदार याद्यांतील त्रुटींविरुद्ध आक्षेप अर्ज दाखल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक व टायगर ग्रुप महाराष्ट्र परभणी जिल्हाध्यक्ष सुनील लक्ष्मणराव जाधव यांनी दिनांक १३ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करून या गोंधळावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जाधव यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १० (हरीनगर, पंचशील नगर, रेल्वे क्वार्टर, पावर हाऊस परिसर) या भागात प्रत्यक्ष रहिवासी मतदारांव्यतिरिक्त, मराठ गल्ली, महादेव मंदिर, भोम नगर आणि व्यंकटी प्लॉट परिसरातील सुमारे ५०० मतदारांची नावे चुकीने या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच रेल्वे वसाहतीतील अनेक मतदार हे कायमस्वरूपी स्थलांतरित असतानाही त्यांची नावे या प्रभागात कायम ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे की, “सदर प्रभागातील मतदारांची सखोल गृहचौकशी करून संबंधितांची नावे योग्य त्या प्रभागात वर्गीकृत करावीत. अन्यथा नागरिकांबरोबर प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, शहरातील अनेक प्रभागांमध्ये लोकसंख्या आणि मतदारसंख्येमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. मतदार यादीची विश्वसनीयता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, नगरपरिषदेकडून झालेल्या या चुकांमागे राजकीय हस्तक्षेपाचा संशय असून, प्रशासनाकडून अशा गंभीर त्रुटी कशा घडल्या, याबाबत चौकशी व्हावी.शहरात सध्या या मुद्द्यावर चर्चा रंगली असून, निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणार का? याकडे पूर्णा शहरवासियांचे लक्ष लागले आहे.











