जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांचे आरक्षण सोमवारी;पुर्णा तालुक्यात कार्यकर्त्यांत धाकधूक वाढली.
पूर्णा,ता.११ (परभणी)-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, आगामी आरक्षण सोडत कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ गटांसाठी आरक्षणाची सोडत येत्या सोमवारी, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे नियोजन सभागृहात मा. जिल्हाधिकारी संजयसींह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे.

पूर्णा तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटांचा समावेश असून, कोणत्या गटावर महिला, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती किंवा सर्वसाधारण आरक्षण लागू होणार याची उत्सुकता स्थानिक नेते, माजी सदस्य आणि इच्छुक उमेदवारांमध्ये शिगेला पोहोचली आहे. काही गटांमध्ये गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सदस्यांचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेकांनी मागील काही दिवसांपासून गटबांधणी, चर्चा आणि रणनीतीला वेग दिला आहे.
तसेच, पूर्णा तालुक्यातील १२ पंचायत समिती गणांच्या सदस्यपदांसाठी आरक्षणाची सोडत त्याच दिवशी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, पूर्णा येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सोडत उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.तहसीलदार माधवराव बोथिकर आणि नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे यांनी इच्छुक नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि जनप्रतिनिधींना या दोन्ही सोडतींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या सोडतीआधी तालुक्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना आणि अंदाजांना ऊत आला आहे. काही गट महिला आरक्षणात जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे अनेक पुरुष नेत्यांची समीकरणे विस्कळीत होण्याची भीती आहे. दुसरीकडे, मागासवर्गीय व अनुसूचित जाती-जमाती गटांवर कोणत्या भागात आरक्षण लागू होणार याकडेही उत्सुकतेने पाहिले जात आहे.राजकीयदृष्ट्या ही सोडत पुर्णा तालुक्यातील पुढील निवडणूक रणधुमाळीचे प्रारंभिक चित्र ठरू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.












