Beed Crime: परळी हादरलं! पोटच्या मुलाने केली जन्मदात्रीची निर्घृण हत्या.!
घर नावावर न केल्याच्या रागातून डोक्यात दगड; ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना
परळी (जि. बीड) ता.२२ (प्रतिनिधी): घर नावावर करून देण्यास आईने नकार दिल्याने परळीत एका पोटच्या मुलानेच जन्मदात्रीचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भोजनाकवाडी गावात शनिवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुनंदा ज्ञानोबा कांगणे (वय अंदाजे ६०) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी मुलगा चंद्रकांत कांगणे याला परळी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा कांगणे यांच्या नावावर गावात राहते घर होते. मुलगा चंद्रकांत याने ते घर आपल्या नावावर करण्यासाठी आईवर वारंवार दबाव आणला होता. मात्र, सुनंदा यांनी घर मुलाच्या नावावर करण्यास नकार दिला. यावरून आई-मुलामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. शनिवारी संध्याकाळी वाद आणखी पेटला आणि संतापाच्या भरात चंद्रकांतने घरातील कुरुंदाचा दगड उचलून आईच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी अवस्थेत सुनंदा यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
🔴 पोलिसांची कारवाई घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत घराच्या वादातून मुलानेच आईचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपी चंद्रकांत कांगणे याला अटक करून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घराच्या नावाच्या वादातून मुलानेच जन्मदात्रीचा बळी घेतल्याने भोजनाकवाडी परिसरात शोककळा पसरली असून, या अमानुष घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.