कौतुकास्पद;बीडच्या’जिव्हाळा केंद्रातील’ अनाथांच्या दातृत्वाने उजळली माणुसकी

Spread the love

धनदांडग्या लोकांसाठी आदर्शवत उदाहरण

बीड, ता.३० (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील महापुराने हजारो कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त केला. स्वप्नांचे घरटे पाण्याने गिळंकृत केले. सिंदफणा नदीच्या रौद्र रूपाने सरवदे कुटुंबासारख्या अनेकांचा संसार नेस्तनाबूत झाला. तब्बल ३६ तास पुराच्या पाण्यात अडकलेल्या या कुटुंबातील नऊ जणांचा जीव तर वाचला, पण भांडीकुंडी, अंथरूण-पांघरूण, मुलांची पुस्तके, शैक्षणिक साहित्य सगळे वाहून गेले. उरलेले फक्त उद्ध्वस्त आयुष्य आणि डोळ्यांतले अश्रू.मात्र अशा भीषण परिस्थितीतही माणुसकी जिवंत असल्याचा दिलासादायक क्षण बीडमध्ये पाहायला मिळाला. ‘जिव्हाळा केंद्रा’मधील ५० अनाथांनी, जे स्वतःही आधारासाठी तळमळतात, त्यांनी कुणी भीक मागून, कुणी घरकाम करून, तर कुणी वाढदिवसाला मिळालेली थोडीफार रक्कम वाचवून जमा केली. आणि त्या थोड्याशा पैशांतून त्यांनी सरवदे कुटुंबाला संसार उभा करून दिला.

मुलांच्या वह्यापुस्तकांपासून ते संसारोपयोगी साहित्यापर्यंत सर्वकाही या अनाथांनी स्वतःहून दिले. स्वतःकडे काहीही नसतानाही दुसऱ्यांच्या दुःखात आधार देण्याची ही भावना खरोखरच डोळ्यांत पाणी आणणारी ठरली.

या घटनेने हे पुन्हा अधोरेखित झाले की माणसाकडे किती आहे हे महत्त्वाचे नाही, पण तो किती वाटतो हेच खरी संपत्ती आहे. महापूराने संसार नेस्तनाबूत केला, पण या ५० अनाथांनी माणुसकीचा दिवा पेटवून दाखवला.हे नक्कीच धनदांडग्या लोकांसाठी आदर्शवत आहे.

You cannot copy content of this page