गोदावरी व पूर्णा नदीला महापूराचा धोका; जायकवाडी व येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
परभणी, दि. २९ सप्टेंबर (प्रतिनिधी) –
जायकवाडी प्रकल्पातून सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीही धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे.प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांत हजारों नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे.
🔹 जायकवाडी धरणातून तब्बल २ लाख ६४ हजार क्युसेक्स विसर्ग
आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता जायकवाडी प्रकल्पातून २,६४,००० क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात येणारी आवक थोडीशी घटून २,५०,००० क्युसेक्स झाली असल्याने पुढील काळात विसर्ग कमी करून २,२५,००० क्युसेक्स ठेवण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाचे एस. के. सब्बीनवार यांनी दिली.
सकाळी ६:४५ ते ७:१५ या वेळेत जायकवाडी धरणातील गेट क्रमांक १० ते २७ या १८ नियमित दरवाज्यांची उंची ०.५ फूटांनी कमी करून १० फूट इतकी करण्यात आली. यामुळे सुमारे ९,४३२ क्युसेक्स विसर्ग घटविण्यात आला. तथापि, सांडव्याव्दारे एकूण २६४०९६ क्युसेक्स इतका प्रचंड विसर्ग गोदावरी नदीत सुरूच आहे. धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पुढील काळात विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट केली जाईल.
🔹 येलदरी धरणातून ३२ हजार क्युसेक्स विसर्ग
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता, धरणातील गेट क्रमांक १,५,६ व १० हे प्रत्येकी १.० मीटर, तर गेट क्रमांक २,३,४,७,८ व ९ हे प्रत्येकी ०.५ मीटर इतक्या उंचीवर सुरू ठेवण्यात आले. या गेटमधून २९,४८० क्युसेक्स विसर्ग होत असून, यासोबतच हायड्रोपॉवरद्वारे २,७०० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.
त्यामुळे सध्या एकूण ३२,१८० क्युसेक्स (सुमारे ९११ क्युमेक) इतका विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ अथवा घट केली जाणार असल्याचे पूर नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे.
🔺 नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
जायकवाडी व येलदरी या दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी व पूर्णा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे,पाथर्डी, सोनपेठ ,मानवत,पालम, पुर्णा तालुक्यातील नदीकाठच्या सर्व १४३ गावांनी सतर्क राहावे,असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे, जिल्हा प्रशासन, पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.अनेक गावात प्रशासनाने आवश्यकतेनुसार गस्त सुरू केली आहे.नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.











