गोदावरी नदीवरील पुल खचला;पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील ताडकळस-पालम राज्यमार्ग अनिश्चित काळासाठी बंद.!
गोदावरीच्या पुलाला मोठी हानी; वाहतूकीसाठी धोकादायक;निर्मानधीन पुला भराव तातडीने भरुन पुल सुरू करण्याची मागणी

पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी) Godavari River Bridge Damage on flood गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि गोदावरी नदीच्या प्रचंड पुरामुळे पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलाला मोठा फटका बसला आहे. पुलाचा डांबरी रस्ता कोसळल्याने वाहतूक धोक्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने ताडकळस-पालम राज्यमार्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.ही घटना गुरुवारी (दि.२५ सप्टेंबर) सायंकाळी उघडकीस आली.यानंतर तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि रस्ता तत्काळ वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले.
पूराचा तडाखा
गेल्या तीन ते चार दिवसांपासून गोदावरी नदी रौद्ररूप धारण करून धोकादायक पातळीवरून वाहत होती. नदीकाठच्या ६० ते ७० गावांना पुराचा वेढा बसला होता. प्रशासनाने १३५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.धानोरा काळे पुलावरून सतत ३ दिवस पाच ते सहा फूट पाणी वाहत होते. पाण्याच्या तडाख्यामुळे पुलावरील डांबराचे थर निघून गेले असून रस्ता तुटक-तुकडे होऊन उखडला आहे.
प्रशासनाची तत्पर कारवाई
तहसीलदार माधवराव बोथिकर, ताडकळस पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या तातडीच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य मुद्दे :
- गोदावरी नदीवरील धानोरा काळे पुलावरील डांबरी रस्ता कोसळला
- अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान
- ताडकळस-पालम राज्यमार्ग अनिश्चित काळासाठी बंद
- शेतकरी व प्रवाशांचे हाल; ग्रामस्थांकडून दुरुस्तीची तातडीची मागणी











