पुर्णेत अतिवृष्टीचा कहर; नांदेड, झिरोफाटा, वसमतकडे जाणारे रस्ते बंद;घरांची पडझड, जनावरे वाहुन गेली, शेतीचे प्रचंड नुकसान; जनजीवन विस्कळीत, प्रशासन रस्त्यावर

Spread the love

पूर्णा ता.२७ (प्रतिनिधी) – पुर्णा तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील तब्बल २१ महसूल मंडळांमध्ये शुक्रवारी (दि.२६ सप्टेंबर) रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (दि.२७) सकाळपर्यंत तालुक्यातील विविध भागात ८३ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा ७५ मिमी, ताडकळस ९७.८ मिमी, लिमला ७७ मिमी, कातनेश्वर ६७.५ मिमी, चुडावा ८५.८ मिमी, तर कावलगावमध्ये तब्बल ९९.८ मिमी पाऊस झाला.अतिवृष्टीच्या मुसळधार पावसाने पुर्णा येथुन नांदेड, झिरोफाटा,वसमतकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले असुन, अनेक गावांत घरांची पडझड झाली तर, जनावरे वाहुन गेली,शेतीचे न भरुन निघणारे प्रचंड नुकसान झाले आहे;जनजीवन विस्कळीत,प्रशासन रस्त्यावर उतरून  बचाव कार्य करत आहे.

       भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने जिल्ह्यासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सर्वोतोपरी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गोदावरी व पूर्णा नदीसह उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने गाव-शिवारात नद्यांचे बँकवाटर शिरत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

रस्ते वाहतूक ठप्प, रेल्वे मार्गावर पाणी, भुयारी पुलाची भिंत कोसळली

अतिवृष्टीमुळे पूर्णा-झिरोफाटा, चुडावा-पूर्णा-वसमत, पूर्णा-नांदेड यांसारखे महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. धानोरा काळे येथील जुन्या पुलावरून गोदावरीचे पाणी वाहू लागल्याने पालम रस्ता बंद करण्यात आला आहे.चुडावा वसमत रोडवरील रुपलापांढरी  शिवारातील रेल्वे गेट क्र१३९ येथिल  भुयारी पुलाखाली पाणी शिरले तसेच पुलाची भिंत कोसळली वसमत मार्ग ठप्प झाला आहे.तर चुडावा रेल्वे स्थानकात पटरीवर पाणी साचले आहे.

बचावकार्य व प्रशासन सज्ज

चुडावा येथे पुराच्या पाण्यात वेढलेल्या व्यक्तीला महसूल, पोलीस व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. याच भागात एका म्हशीसह शेतकरी पुरात अडकला होता, त्यालाही बोटीच्या साहाय्याने वाचवण्यात आले.तहसीलदार माधवराव बोथिकर, सहा पोलीस निरीक्षक सुशांत किनगे,नायब तहसीलदार प्रशांत थारकर,मंडळ अधिकारी के.पी.शिंदे आदींच्या उपस्थितीत पालीकेच्या अग्निशमन दलाचे जवान गणेश रापतवार अमजद कुरेशी सोनाजी खिल्लारे दीपक गवळी यांची उपस्थिती होती.सोनखेड पांढरी व हिवरा गावांना नदीला पूर आला आहे .चुडावा शिवारात एका शेतकऱ्याच्या दोन म्हशी वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.यावेळी माटेगांव एरंडेश्वर,आहेरवाडी ,नावकी परिसरात थुना नदीला देखील पुर आला आहे.

गावोगावी पाणी शिरले, संसार उद्ध्वस्त

कावलगाव, निळा, आडंगाव, कंठेश्वर,अजदापुर ,कानडखेड गाव , शिवारासह   घरे, धान्य, पशुधन व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. पुनर्वसित निळा महागांव ,कळगांव वस्तीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांच्या छपरातून पाणी गळती होत आहे. त्यामुळे महिलांसह नागरिकांचे हाल वाढले आहेत.

प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रशासन, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत सज्ज आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपले धान्य व जनावरे सुरक्षित स्थळी हलवावेत, तसेच नदी-नाले व पूरग्रस्त रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

एकूणच पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पुर्णा तालुका व परिसरात पुरस्थिती गंभीर बनली असून, सर्वत्र हाहाकार माजला आहे.

You cannot copy content of this page