Mahashivratri;परळीत प्रभु वैजनाथांची अलंकारिक महापूजा
भाविकांची अलोट गर्दी;शहराला यात्रेचे स्वरूप;मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
प्रकाश वर्मा
परळी (जि. बीड)ता१५/प्रतिनिधी;
Beed Parli Vaijanath Mahashivratri महाशिवरात्रीच्या निमित्ताने परळी येथील परळी वैजनाथ मंदिरात प्रभू वैद्यनाथाची आकर्षक अलंकारिक महापूजा बांधण्यात आली आहे. मौल्यवान दागदागिने आणि सुंदर फुलांच्या सजावटीने सजवलेल्या भगवान शंकरांच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यासह बाहेरील भागांतूनही लाखों भाविक परळीत दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात ‘जय शिवशंभू’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले आहे. पहाटे पासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून दिवसभरात लाखो भाविक दर्शन घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेची तयारी पूर्ण झाली असून मंदिर प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांना पिण्याचे पाणी, दर्शन रांगा, विविध सामाजिक संघटनांनी फराळाचे वाटप, वैद्यकीय सुविधा आदी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.परळी शहरात महाशिवरात्री निमित्त शहरात यात्रेचे स्वरूप आले आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने शहरात आणि मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, मंदिर परिसरात विविध सेवाभावी संस्थांकडून उपवासाचे पदार्थ आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगा सुरू राहतील, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. महाशिवरात्रीनिमित्त परळी नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.











