पूर्णेत भवानी आई नवरात्रोत्सवास सुरुवात
पूर्णा, ता.२२ (प्रतिनिधी): शहराचे आराध्य दैवत तुळजापूरच्या आई भवानीचे ठाणे समजल्या जाणाऱ्या अंबानगरीतील भवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारपासून (ता.२२) घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होत असून, दहा दिवसांचा हा महोत्सव भक्तिभाव, सजावट आणि धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे.
मंदिर परिसर सजावटीने उजळून निघाला असून आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसराला चकाकी प्राप्त झाली आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. यासाठी मंदिर समितीकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती मंदिराचे पुजारी खराटे कुटुंबीयांनी दिली.
महोत्सवादरम्यान दररोज पहाटे ४ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची रांग लागते. महिलांची उपस्थिती यामध्ये लक्षणीय असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी होत आहे. तसेच नगरपालिकेकडून देवी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पथदिव्यांची व्यवस्था, तसेच दहा दिवस अखंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.
विजयादशमीपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवामुळे संपूर्ण शहरात धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली आहे. देवीच्या गजराने आणि भक्तिरसाने अंबानगरी नवरात्रोत्सवी रंगात रंगली असून, भाविकांत मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.