मविआचे सरकार सत्तेवर येताच पुन्हा कर्जमुक्ती करु-उद्धव ठाकरे

Spread the love

परभणीत उद्धव ठाकरेंची विराट सभा;भाजपसह महायुतीवर हल्लाबोल

परभणी/प्रतिनिधी
मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवली.नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजारांची मदत केली होती.राज्यातील महायुती शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देऊ शकली नाही.त्यांनी शेतमालाचे भाव पडले, शेतकरी पूर्णतः निराश झाले आहेत.महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच पुन्हा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केली.
परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (दि.९) नोव्हेंबर रोजी संध्या जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत श्री.ठाकरे बोलत होते.व्यासपीठावर खा. संजय (उर्फ)जाधव, खा.फौजिया खान, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे उमेदवार आ.डॉ.राहुल पाटील व गंगाखेड मतदार संघाचे उमेदवार विशाल कदम , पाथरी येथील काँग्रेसचे उमेदवार आ.सुरेश वरपूडकर, मा आ.अ‍ॅड. विजय गव्हाणे, मा. आ.सुरेश देशमुख,मा.आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, सौ.मीराताई रेंगे, डॉ.विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव,मा.नगराध्यक्ष संतोष एकलारे, अॅड.मनोज काकाणी, प्रा.किरण सोनटक्के,अ‍ॅड.दीपक देशमुख आदींची उपस्थिती होती.
या सभेत बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने तरुण, व्यापारी,छोटे उद्योजक, कामगार यांच्या सह शेतकरी,शेत मजुरांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. राज्यातील अनेक महत्वाचे विकास प्रकल्प गुजरातला नेऊन तरुणांवर बेरोजगारीची वेळ आणली.शेत मालाचे भाव पाडले, महागाईने जनता होरपळून निघत आहे. शेतकर्‍यांच्या समस्या आजही कायम आहेत.असा आरोप करत महायुती म्हणजे महाराष्ट्राची अधोगती अन् गुजरातची प्रगती असल्याची टीकाही माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी मुख्यमंत्री पदासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी लढत आहे. सर्व यंत्रणा असली तरी आपले काही करू शकत नाहीत.मोदींकडे या निवडणुकीत कुुठलेच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. देशात महिला सुरक्षीत नाहीत. बेरोजगार तरूणांसह मी आदित्यला आणि शरद पवार हे सुप्रियाला मुख्यमंत्री करणार असल्याच्या बढाया अमित शहा मारत आहेत. अगोदर त्यांनी जय शहाला काय करणार ते सांगावे, असे ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी अमित शाह यांना काही सवाल विचारत जय शाह यांना खुले आव्हान दिले. जय शाह यांच्यापेक्षा समोर बसलेले परभणीतील तरुण चांगले क्रिकेट खेळतात. जय शाहांनी यांच्यातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावे, मग त्यांना बीसीसीआय नाही तर आणखी कुठल्याही क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद द्यायचे ते द्यावे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.आता भाजप संकरित पक्ष झाला आहे. मोदी-शहांनी भाजप संपवला. मणीपूर पेटलेले असताना पंतप्रधान तिकडे जात नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास परत एकदा कर्जमुक्ती करु, बेरोजगारांना दरमहा 4 हजार रुपये देणार, पाच जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवणार असेही त्यांनी सांगितले. सिंंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला, तो वार्‍याने पडल्याचे सांगतात. या कामात महायुती सरकारने पैसे खाल्ले आहेत, ही महाराष्ट्राची थट्टा आहे, असे ते म्हणाले. यावेळी खा.जाधव, खा.खान, आ. पाटील, आ.वरपूडकर, श्री.कदम, श्री.देशमुख यांनी मनोगत मांडले.

You cannot copy content of this page