Parli Crime व्यसनाधीन पतीकडून पत्नीचा पोट फाडून खून :
परळी तालुक्यातील डाबी गाव हादरले
परळी ता.१४ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील डाबी गावात घडलेल्या एका क्रूर घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दारूच्या व्यसनाधीन पतीने स्वतःच्या पत्नीचा पोट चिरून खून केल्याची भीषण घटना शनिवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आली. या घटनेत दारुड्या पतीच्या रागामुळे तीन निरपराध लेकरांचा संसार उद्ध्वस्त झाला असून गावभर या घटनेमुळे भीती व संतापाचे वातावरण आहे.
मृत पत्नीचे नाव शोभा तुकाराम मुंडे (वय ३७) असे असून, संशयित पती तुकाराम मुंडे हा गुन्ह्यानंतर फरारी झाला आहे. तालुक्यातील डाबी येथील तुकाराम मुंडे याला दारूचे प्रचंड व्यसन होते. या कारणावरून त्याचे पत्नीशी सतत वाद व्हायचे. दोन वर्षांपूर्वीही त्याने पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केला होता. तेव्हा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला तरी नातेवाईकांच्या दबावामुळे शोभाने तो गुन्हा मागे घेतला होता.
मात्र शुक्रवारी रात्री रागाच्या भरात तुकारामने पत्नीवर अत्यंत निर्घृण हल्ला करून तिचे पोट चिरले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाला, तेव्हा शोभाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तिच्या पोटातील आतडे बाहेर आलेले पाहून ग्रामस्थही भयभीत झाले.
🔴 दूधवाल्यामुळे उघड झाला प्रकार
दररोजप्रमाणे सकाळी दूधवाला आला तेव्हा घरातून कोणी प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ झाल्यानंतर शंका आल्याने त्याने पुन्हा आवाज दिला. त्याच वेळी घरातील लहान मूल जागे झाले आणि आई मृत पडल्याचे पाहून आरडाओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थ धावून आले व पोलिसांना माहिती देण्यात आली.
🔴 पोलिसांचा तपास सुरू
परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. आरोपी तुकाराम मुंडे फरारी असून त्याच्या शोधासाठी विशेष पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.
🔴 नातेवाईकांचा संताप, पोलिसांचे आश्वासन
या अमानुष घटनेनंतर नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी तातडीने आरोपीला अटक करण्याची मागणी केली. यावर पोलिस अधिकाऱ्यांनी तुकारामला लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.