पूर्णेतील रेल्वे उड्डाणपूलाचे काम संथगतीने
साडेचार वर्षांपासून सुरू आहे निर्माण कार्य;वाहतूकदारांची गैरसोय
पूर्णा(प्रतिनिधी)
शहरातील हिंगोली नांदेड रेल्वे गेट परिसरात महारेल कार्पोरेशनच्या वतीने कोरोना काळापुर्वी पूर्णा ते अकोला तसेच नांदेड लोहमार्गावर उड्डाणपुल उभारणीचे काम हाती घेतले आहे.घेण्यात आले आहे. परंतु साडेचार वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे शहरातील नागरिकांसह येथून ये-जा करणा-या वाहतूकदारांची मोठी गैरसोय होत आहे.
रेल्वेच्या दक्षिण-मध्य सिकंदराबाद ते मनमाड या मार्गावर पूर्णा रेल्वे जंक्शन आहे. या ठिकाणी पूर्णा ते अकोला, पूर्णा ते परळी असा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गांवर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महारेलच्या वतीने मागील तीन वर्षांपासून पूर्णाशहराच्या पूर्व बाजूला दोन किलोमीटर अंतराचे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, मागील ३ वर्षांपासून हाती घेण्यात आलेले काम हे अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, वाहतूकदारांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु, पर्यायी रस्ता हा खड्डेमय बनला आहे. या पर्यायी रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्यामुळे वाहतूकदारांना आपली वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत आहेत. एकंदरीत सध्या परभणी जिल्ह्यात साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. या भागातून बरीचशी वाहने साखर कारखान्या कडे ये-जा करतात. परंतु, मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पर्यायी रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर मागील तीन वर्षांपासून काम सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावर धुळीचे लोळ उठत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधितांना आदेश देऊन तत्काळ उड्डाण पुलाच्या कामाला गती देण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.