येलदरी,सिद्धेश्वर जलाशयाचे रब्बी,उन्हाळी हंगामासाठी पाणी वाटपाचे नियोजन ठरले.

Spread the love

विशाल कदम यांच्या मागणीला यश;छत्रपती संभाजी नगर येथे कालवा समीतीची बैठक संपन्न;४-४ पाळ्यांत मिळणार शेतीला पाणी

पूर्णा(प्रतिनिधी)/गुरुवार दि.२८ नोव्हेंबर २०२४
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी येलदरी,सिद्धेश्वर जलाशयाचे रब्बी,उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याच्या केलेल्या मागणीला यश मिळाले असुन,नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी,सिद्धेश्वर प्रकल्पांतून या वर्षात सिंचनासाठी चार-चार पाळ्यांचे नियोजन मंजुरी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळा अखेरपर्यंत ह्या पाणी मिळण्याचा  मार्ग मोकळा झाला आहे.
      यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका-२०२४ ची आचारसंहिता लागू झाल्याने येलदरी सिद्धेश्वर प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक लांबली होती.म्हणुनच नोव्हबर महीन्यात प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी वेळेत मिळाले नसल्याने शेतकरी धास्तावले होते.दरम्यान सिंचनासाठी पाळ्यांचे नियोजन तातडीने जाहीर करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी संबंधित विभागाकडे केली होती.त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय,  यांच्या अध्यक्षतेखाली दि. २५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली.या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या अधीन राहून दि.१५ ऑक्टोबर रोजीच्या धरणातील १०० टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत रब्बी हंगामात चार (०४) पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामात चार (०४) पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास मान्यता मिळालेली आहे.
       प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभ धारकांना व धरण जलाशय,अधिसूचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना ७,७-अ मध्ये भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावे लागणार असल्याचे समजते.पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी, सिद्धेश्वर जलाशयायातुन रब्बी हंगामासाठी दि.२५ रोजी पाणी सोडले असुन हे पाणी सध्या हट्टा,वसमत, हिंगोली जिल्ह्यातील शेतीला मिळणार आहे.येत्या चार ते पाच दिवसांत सदरील पाणी पूर्णा वितरीकात सोडले जाणार असल्याचे उपविभागीय अभियंता मोरे यांनी कळवले आहे.

You cannot copy content of this page