Purna flood गोदावरीच्या बॅकवॉटरमधून तिघांची सुटका

Spread the love

पूर्णा तहसीलदार, पोलीस व पालिकेच्या पथकाचे कावलगांव आलेगांव शिवारात रेस्क्यू ऑपरेशन; समृद्धी महामार्गावरील कर्मचारी सुखरूप बाहेर

पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) : Purna Godavari Flood News गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आलेगांव-कावलगांव शिवारातील खडकी नदीला मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर जमा झाले होते. याच पुराच्या पाण्यात समृद्धी महामार्गाचे काम करणारे तीन कर्मचारी आलेगांव-कावलगांव रस्त्यावरील खडकी नदीच्या पुलावर मंगळवारी (ता.२३) रोजी मध्यरात्रीपासून अडकून पडले होते.स्थानिक महसूल प्रशासन,पोलीस व पालिकेच्या पथकाने तत्परतेने राबविलेल्या रेस्क्यू मोहिमेतून अखेर या तिघांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

कावलगांव शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला मंगळवारी मध्यरात्री मोठा पूर आला. या पुराचे पाणी खडकी नदीत शिरल्याने नदीपात्रात बॅकवॉटर साचले. खडकी नदीच्या पुलावर काम करणारे सुनील रॉय (वय ३०), रोहित पंडित (वय ३५) आणि संतोष भेंबर (वय ३५) हे नॉनटोकारलो कंपनीचे कर्मचारी पाण्यात अडकले. अडचणीत सापडल्यावर कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग व चुडावा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

घटनास्थळी तहसीलदार माधवराव बोथीकर, सपोनि सुशांत किनगे, मंडळ अधिकारी के. पी. शिंदे, श्रीमती शेलगावकर, तलाठी अंकुश राठोड, महसूल कर्मचारी, पोलीस पाटील तसेच स्थानिक कार्यकर्ते दाखल झाले. भाजप नेते बाजार समितीचे उपसभापती नारायणराव पिसाळ व शिवसेना (शिंदे गट) चे गंगाखेड विधानसभा प्रमुख गजानन सवराते यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतीसाठी धाव घेतली.

तहसीलदार बोथीकर यांनी तातडीने पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनास्थळी पाचारण केले. विभागप्रमुख गणेश रापतवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमजद कुरेशी, सोनाजी खिल्लारे, दीपक गवळी, नागेश खंदारे, अनिल बनसोडे या जवानांनी बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या ठिकाणी पोहोचले. अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासाच्या प्रयत्नांत कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले.

दरम्यान, मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे गोदावरी नदीला प्रचंड पूर आला आहे. जायकवाडी धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून, सुमारे ३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. परिणामी गोदावरीला मिळणाऱ्या सिंदफणा, विना, दुधना, पूर्णा यांसह लहानमोठ्या नद्या व नाल्यांनाही पूर आला आहे. शेकडो गावांत पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page