उड्डाणपुलावर दुचाकी-रोड लेव्हलरची समोरासमोर धडक
पुर्णा शहरातील घटना;२० वर्षीय तरुण गंभीर जखमी
पूर्णा, ता.८ (प्रतिनिधी) –शहरातील उड्डाणपुलावर दुचाकी आणि रोड लेव्हलर ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.८) सायंकाळी घडल्याचे उघडकीस आले,या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला बेशुद्ध अवस्थेत पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

अजय जयपाल पवार (वय २०, वर्षे रा.रामनाईक तांडा, ता.कंधार, जि.नांदेड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा कंधार येथून आपली दुचाकी (क्र. एमएच-२६-सीजे-६८७२) घेऊन वसमत तालुक्यातील जवळा बाजार येथे बहिणीकडे जात होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पूर्णा शहरातील उड्डाणपुलावरून शहराच्या दिशेने उतरत असताना समोरून येणाऱ्या (एम.एच.३८/ व्ही/७४२०) या रोड लेव्हलर ट्रॅक्टरसोबत त्याच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या भीषण धडकेत अजय पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागून तो रस्त्यावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पूर्णा पोलिसांना कळवले. त्यानंतर पो.नि. विलास गोबाडे, स.पोनि.गजानन पाटील, पोलीस कर्मचारी शेंबेवाड व घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे पोलिसांनी जखमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. ग्रामीण रुग्णालयात डॉ.गणेश काचगुंडे यांनी प्रथमोपचार करून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे तातडीने हलविण्यात आले. या प्रकरणाची नोंद पूर्णा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी दिली.
हेल्मेट असते तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती…
दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट बंधनकारक असतानाही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. या अपघातातही संबंधित तरुणाने हेल्मेटचा वापर केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. हेल्मेट वापरले असते तर अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
उड्डाणपुलावर सुरक्षेची उपाययोजना करा-गलांडे

उड्डाणपुलावर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत असून दिशा दर्शक फलक, गती नियंत्रक पट्टे आदी सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शहरातील बाबा पेट्रोल पंपासमोर सुमारे ३० ते ४० मीटर रस्ता अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आल्याने त्या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे सांगत संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उबाठा) उपशहरप्रमुख शंकर गलांडे यांनी केली आहे.











