Parbhani एरंडेश्वर द्राक्षायणी देवी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान
आदीशक्तीच्या जागराला सुरुवात;भाविकांची रिघ
पुर्णा ता.२३(प्रतिनिधी): Parbhani/Purna Dakshayni Devi Navratri festival News परभणी-हिंगोली सीमेलगत असलेले एरंडेश्वर हे धार्मिक वारशासाठी प्रसिद्ध गाव असून, येथे द्राक्षायणी देवी व अन्नपूर्णा देवी मंदिरात यंदाही नवरात्रोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात दाक्षायणी मातेच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे.
एरंडेश्वर हे एक हजार उंबरठ्याचे प्राचीन गाव असून, येथे द्राक्षायणी देवीसह नृसिंह, पंचमुखी गणपती, हेमाडपंथी महादेव, नागनाथ व माधवस्वामी अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गावालगतच्या झिरोफाटा-पुर्णा रोडवर द्राक्षायणी देवी मंदिर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जुन्या काळात या देवीस ‘तुकाई’ या नावानेही ओळखले जात असे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मंदीरातील चोरीनंतर संत ओंकारेश्वर भगवान महाराजांनी देवीची पुनःस्थापना करून ‘द्राक्षायणी देवी’ हे नाव दिल्याची अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. सध्या येथे सुसज्ज सभागृह व भक्तांसाठी सोयीसुविधा उभारण्यात आल्या असून, दरवर्षी नवरात्रोत्सव भव्य पद्धतीने साजरा होतो.
नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सजले असुन,दिपमाळ उजळून निघाल्या आहेत.आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.नवरात्रीच्या पहील्या माळे पासुनच परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
—————————————————————-
श्री.सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थान एरंडेश्वर नवरात्र उत्सव
एरंडेश्वर येथील सिद्धेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता महंत शिवानंद भारती महाराज यांच्या हस्ते घटस्थापनेने नवरात्रोत्सवाची सुरुवात होईल.
नवरात्र काळात दररोज सकाळी काकडा भजन, अभिषेक, दुर्गादेवी सप्तशती पारायण, दुपारी श्रीमद् भागवत कथा तसेच संध्याकाळी हरिपाठ, आरती, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे. दि.६ ऑक्टोबर रोजी हभप. अशोक महाराज रणेर यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर देवीची महाआरती, महाप्रसाद तसेच रात्री १० वाजता अन्नपूर्णा देवीची पालखी मिरवणूक काढली जाईल. मध्यरात्री कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम होणार आहे.
भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महंत शिवानंद भारती महाराज व ग्रामस्थांनी केले आहे.













