पूर्णेत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीदिनी महाबुद्ध वंदनेचे आयोजन

Spread the love

बुद्धमुर्तीची भव्य शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल

पूर्णा,ता.२५(प्रतिनिधी)

वैशाख पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरातील बोधिसत्व डॉ.बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती, भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरात शुक्रवार,(ता.०१) मे रोजी महाबुद्ध वंदना, शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अ.भा.भिख्कु महासंघाचे कार्याध्यक्ष  भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी दिली आहे.

       भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पुर्णा शहरात १ में रोजी बुद्ध विहार, भदंत उपाली थेरो नगर येथे या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण रेसुबलाचे निरीक्षक संजयकुमार पासवान यांच्या हस्ते तर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण नांदेड येथील भिक्खू शिलरत्न थेरो (नांदेड) यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बुद्ध विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. श्रद्धेय भिक्खू संघाच्या उपस्थितीत सामुहिक महाबुद्ध वंदनेला प्रारंभ होईल. या वेळी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो  हे मुख्य मार्गदर्शक करणार आहेत.यावेळी भिक्खू पव्याबोधी थेरो, भिक्खू पय्यावंश, भिक्खू संघरत्न, भिक्खू गगनबोधी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस उपअधीक्षक भिमराव शिंगाडे,डॉ. परमेश्वर साळवे व प्रा.डॉ.भिमराव खाडे उपस्थित राहणार आहेत.

महाबुद्ध वंदना समाप्तीनंतर सकाळी ९ वाजता तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तीची भव्य धम्म मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत डॉ. आंबेडकर चौक येथे पोहोचणार आहे. सकाळी १० वाजता तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. यावेळी पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण अविनाश गायकवाड यांच्या हस्ते होणार असून, त्रिशरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाचा समारोप होईल.या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी केले आहे.

You cannot copy content of this page