भरधाव हायवाची एसटीला धडक;प्रवाशी बालंबाल बचावले

Spread the love

१६ हजारांचे नुकसान,हायवा चालकावर गुन्हा दाखल

पूर्णा,ता.२४(प्रतिनिधी),

चुडावा-वसमत मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा ट्रकने एसटी बसला धडक मारुन घासत नेल्याची धक्कादायक घटना घडली असून, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी बालंबाल बचावले आहेत.या अपघातात बसचे सुमारे १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात हायवा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद चांगोजी सुर्यवंशी (वय ३२), व्यवसाय चालक, वसमत आगार, रा. देगाव ता. पूर्णा जि. परभणी हे २४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.२५ वाजता एमएच १४ बीटी २२४९ क्रमांकाची एसटी बस धानोरा मोत्या येथून वसमत घेऊन जात होते. दरम्यान, चुडावा-वसमत फाट्यांपासून सुमारे २ किमी अंतरावर चुडाचा शिवार परिसरात समोरून येणाऱ्या (एम.एच २१/बीएच/ ७०७८) क्रमांकाच्या हायवा ट्रकने भरधाव वेगात येत बसच्या ड्रायव्हर साईडला घासत नेले.या धडकेत एसटी बसच्या मागील दोन खिडक्या फुटल्या तसेच बसचा पत्रा फाटून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

     या प्रकरणी हायवा चालक नामदेव दगडोबा ठोके (रा. नांदापूर, ता. जि. परभणी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, ३२४ (३), (४) अंतर्गत गुन्हा क्रमांक ११७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस हवालदार काकडे हे करत आहेत.

You cannot copy content of this page