आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराकडून मधुरा तिळकरीचा गौरव

Spread the love

ग्रामीण मुलीचे वैद्यकीय शिक्षणातील यश सर्वांसाठी प्रेरणादायी–महादेव इटके

परळी वैजनाथ ता.३१(प्रतिनिधी) :
परळी शहरातील कु. मधुरा संदीप तिळकरी हिने NEET 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या परिवारासह शहराचेही नाव उज्ज्वल केले आहे. तिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे एम.बी.बी.एस. या कोर्ससाठी प्रवेश निश्चित झाला आहे. या यशाचा आनंद व्यक्त करत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, परळी वै यांच्या वतीने तिचा उत्साहवर्धक सत्कार करण्यात आला.
सत्कार कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महादेव इटके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. सुदाम कापसे, श्री. शिरीष चौधरी, सौ. रेणुका चौधरी, कु. मधुरा महादेव इटके, श्री. संदीप तिळकरी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. संजयभैया सेवलकर यांनीही उपस्थित राहून कु. मधुरा हिच्या मेहनतीचे व जिद्दीचे मनापासून कौतुक केले.
यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महादेव इटके म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील मुलीने वैद्यकीय क्षेत्रात दाखल होणे हा आनंदाचा विषय असून, हे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कु. मधुरा हिने आपली अभ्यासातील प्रामाणिकता, चिकाटी व शिस्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. पुढील वैद्यकीय शिक्षणातही ती निश्चितच उत्कृष्ट यश संपादन करून समाजसेवेसाठी आपले योगदान देईल,” असे प्रतिपादन श्री इटके यांनी केले.
कु. मधुराच्या या यशामध्ये तिचे वडील आदर्श शिक्षक श्री. संदीप तिळकरी यांचा विशेष मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने योग्य मार्गदर्शन केले तसेच अभ्यासातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिक परिश्रम यांचे महत्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, “मुलीने मेहनत आणि शिस्त यावर विश्वास ठेवून हे यश मिळवले आहे. पुढे ती डॉक्टर म्हणून समाजसेवेत कार्य करेल, हीच आमची अपेक्षा आहे.”
यासोबतच काका श्री. दीपक तिळकरी, काकू सौ. वर्षा दीपक तिळकरी आणि भाऊ चि.सोहम यांनीही अखंड पाठबळ दिले. त्यांच्या प्रेरणेने आणि सहकार्यानेच मधुराने हे स्वप्न साकार केले.कार्यक्रमाच्या शेवटी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने कु. मधुरा हिला उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पालक, नातेवाईक व शिक्षकांनीही तिच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.

You cannot copy content of this page