रेणुका मातेचे उपपीठ राणी सावरगांवची रेणुका माता

Spread the love

नवरात्रात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गंगाखेड ता.२५(प्रतिनिधी) : गंगाखेड तालुक्यातील गोमती नदीच्या काठावर वसलेल्या बालाघाट डोंगररांगांमध्ये असलेले राणी सावरगाव येथील रेणुका मातेचे उपपीठ नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र ठरले आहे. माहुरच्या रेणुका मातेचे उपपीठ मानले जाणारे हे स्वयंभू जागृत देवस्थान चारही जिल्ह्यांच्या सीमेजवळ असल्याने नवरात्रात पंचक्रोशीतून तसेच परराज्यातूनही भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.

हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या मंदिरात तांदळाची स्वयंभू मूर्ती असलेली देवीमाता भक्तांच्या प्रत्येक मनोरथाची पूर्तता करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी नवरात्रात पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागतात. महिलावर्ग मोठ्या संख्येने परड्या भरण्याचा नवस फेडतो. पायी दिंड्या काढत हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.

संस्थानाच्या वतीने भाविकांसाठी सुसज्ज भक्तनिवास, ओट्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. याशिवाय संस्थानाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत झाल्यामुळे मिळालेल्या निधीतून विविध कामांना गती मिळाली आहे. मात्र वाढत्या भाविकांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर संस्थानाचा विकास तुळजापूरच्या धर्तीवर करावा, अशी मागणी विश्वस्तांकडून सातत्याने केली जात आहे.

या देवस्थानाची काही वैशिष्ट्ये विशेषत्वाने उल्लेखनीय आहेत. नवरात्रातील नवमीच्या दिवशी देवीच्या मूर्तीवर बोकडाचा बळी दिला जातो. त्यानंतर होमहवन करून विधीवत पूजा केली जाते. या मानाचा अधिकार धनगर आणि हाटकर समाजाला मिळालेला आहे. पालखी उचलण्याचा मान भोई समाजाला, मशाल नेण्याचा मान न्हावी समाजाला तर देवीला तांबुल अर्पण करण्याची जबाबदारी गावातील मुस्लिम कुटुंबांकडे आहे. या परंपरा सामंजस्य, सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतात.

दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी गावातून वाजत-गाजत मिरवणुकीसह डोंगरावरील मूळ पीठापर्यंत नेली जाते. यावेळी गावातील प्रत्येक घरात देवीच्या पालखीचे औक्षण करण्याची परंपरा आजही जोपासली जाते. त्यानंतरच घरातील सदस्यांचे औक्षण केले जाते.

राणी सावरगाव येथील रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवामुळे परिसर भक्तिभाव, सांस्कृतिक उपक्रम आणि उत्साहाने उजळून निघाला आहे.


You cannot copy content of this page