घमंडसिंग जुनी यांची राज्यस्तरीय समितीवर निवड
‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
परळी ता.१६ (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनातर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्य सरकारने विशेष समिती गठीत केली असून, बीड जिल्ह्यातील परळी येथील सामाजिक कार्यकर्ते घमंडसिंग सुरजसिंग जुनी यांची या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.

गुरु तेग बहादुर साहिब यांच्या बलिदान, त्याग आणि शिकवणीचा गौरव करण्यासाठी राज्यभर कथा, कीर्तन, नगर कीर्तन यांसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यांतील सदस्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमांचे मार्गदर्शन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले. राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेट देऊन या कार्यक्रमांची तयारी सुरू असून, नांदेड, नागपूर आणि मुंबई येथे मुख्य सोहळे होणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देश-विदेशातील सिख, सिंधी, बंजारा, लबाना व मोहियल समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती घमंडसिंग जुनी यांनी दिली.
सन २०२५ हे गुरु तेग बहादुर साहिब यांच्या शहिदीचे ३५० वे वर्ष असून, त्यांच्या शौर्य, त्याग आणि विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या समितीच्या माध्यमातून घमंडसिंग जुनी हे बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, त्यांच्या निवडीबद्दल सर्व समाजबांधवांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.












