सामाजिक कार्यकर्ते संदिप चौंडेंकडून पूरग्रस्तांसाठी २१ हजारांची मदत

Spread the love

परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)सामाजिक कार्यकर्ते संदीप चौंडे यांनी परळी तालुक्यासह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपल्या आई, वडीलांच्या स्मरणार्थ २१ हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेश स्वरूपात परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली. संदिप चौंडे यांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या या बदतीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परळी तालुक्यासह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन त्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेले तर अनेकांच्या घरादाराचेही नुकसान झाल्याने शेतकरी मोडून पडला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासन, सामाजिक संघटना मदत करीत आहेत. मात्र पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, काढणीला आलेले पीक पावसामुळे खराब झाले आहे. मोडून पडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी परळी येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप चौंडे यांनी आपल्या आई कै. रमाबाई रवींद्र चौंडे यांच्या स्मरणार्थ मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे २१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी भाजपा सरचिटणीस अश्विन मोगरकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुशील हरंगुळे, शिवसेनेचे नेते रमेश चौंडे, पत्रकार महादेव गित्ते उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते संदीप चौंडे यांनी आजपर्यंत अनेकवेळा सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. वेळोवेळी विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात, अनेक सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी असतात. संदिप चौंडे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीबद्दल तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी कौतुक केले आहे.

You cannot copy content of this page