चोरटे पोलिसांच्या बेडीत अडकेनात?

Spread the love

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  ८ घरफोड्या व जबरी चोऱ्यांचे प्रकरण; महिना उलटूनही तपास ठप्प, चोरट्यांचा सुगावाही नाही! नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी

पूर्णा,ता.२८(प्रतिनिधी) : पूर्णा शहर आणि परिसरात मागील महिन्याभरात घरफोड्या व जबरी चोऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, तब्बल आठ चोऱ्यांच्या घटना घडूनही चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. विशेष म्हणजे, ऐन पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील रस्त्यावर असलेल्या माजी नगराध्यक्षांच्या घरातही चोरी झाल्याने पूर्णा पोलिसांच्या कार्यक्षमचे तीनतेरा वाजल्याची चर्चा असून, शहरात रंगली आहे.२७ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत शहरात एकामागून एक घरफोड्या आणि दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या. मात्र, महिना उलटूनही या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे चोरटे पोलिसांच्या बेडीत अडकत नाहीत की पोलिसांचे जाळेच चोरट्यांपर्यंत पोहोचत नाही? असा संतप्त सवाल आता पूर्णेकर विचारू लागले आहेत.

      पूर्णा शहरातील सिद्धार्थनगर येथे शिवगंगा अहिरे यांच्या घरात चोरी झाली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील रस्त्यावर असलेल्या माजी नगराध्यक्ष स्व. सुभाषसिंह ठाकूर यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला. कानखेड परिसरातील मारुती वैद्य व मारुती धोत्रे यांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. याशिवाय महावीरनगर, डॉक्टर लेन आणि महाराष्ट्र बँक परिसरात चोरट्यांनी धाडसी कारवाया केल्या.सुभद्रा ज्वेलर्स, शिवा झेरॉक्स, पलसिद्ध ग्राहक सेवा केंद्र आणि कनिष्क ग्राहक सेवा केंद्र अशी चार दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या. शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांवर वचक निर्माण करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.

      या चोऱ्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस दल प्रमुखांनी गुन्ह्यांची उकल करण्यात तरबेज असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही तपासासाठी मैदानात उतरविण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या यंत्रणेनंतरही चोरट्यांपर्यंत पोहोचणारा ठोस धागादोरा हाती न लागल्याने तपासाच्या गतीवर परिणाम झाला आहे. पूर्णा पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा उपलब्ध असतानाही शहरातील चोरीच्या घटना रोखण्यात आणि घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, कमी होत चाललेले प्रभावी पोलीसिंग आणि वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

          नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा पोलीस यंत्रणेचे लक्ष नेमके कुठे आहे? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहरात जबरी चोरी आणि घरफोड्यांच्या घटना सातत्याने घडत असताना रात्रीची गस्त, संशयितांवर नजर आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, चोरीच्या घटनांची उकल करण्यात सातत्याने अपयश येत असतानाही संबंधित जबाबदारांवर वरिष्ठ स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतः लक्ष घालून चोरीच्या मालिकेचा तपास गतिमान करावा, तसेच जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी पूर्णेकरांमधून जोर धरत आहे.

८ चोऱ्या… तरीही चोरटे मोकाट!

महिनाभरात तब्बल आठ चोरी व घरफोडीच्या घटना घडूनही एकाही प्रकरणाची ठोस उकल न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील घरही सुरक्षित राहत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा थेट प्रश्न आता पूर्णेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

You cannot copy content of this page