पूर्णेत दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन-भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांची माहिती

Spread the love

दक्षीण कोरियाचे भिक्खू शेर इन चांग, भिक्खू डॉलीची रॅन यांची प्रमुख उपस्थिती

पूर्णा/(प्रतिनिधी)

शहरातील उपाली थेरोनगरातील बुद्धविहारात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी असे दोनदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन बोधिसत्त्व डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
       पूर्णा येथील बौद्ध विहार परिसरात मागील २१ वर्षांपासून स्मृतिशेष भदंत उपाली थेरो यांच्या स्मृतीदिनी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. अखंडीत पणे सुरू असलेली ही परंपरा यावर्षी ही कायम आहे. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पंचरंगी धम्म ध्वजारोहण भदंत चंद्रबोधी महाथेरो (कॅनडा) यांच्या हस्ते होईल. सकाळी १०.३० वाजता बुद्धविहारात धम्म ध्वजारोहण अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते होईल. त्यानंतर बुद्धविहारात त्रिशरण, पंचशील, सामूहिक बुद्ध वंदना व पूजाविधी होईल. दुपारी १२.३० वाजता डॉ. आंबेडकरनगर पूर्णा येथील धम्म ध्वजारोहण होईल व त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांची रथात शहरामधून धम्म मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी ३ वाजता परिषदेचे उद्घाटन दक्षिण कोरिया येथील भिक्खू शेर इन चांग यांच्या हस्ते होईल. त्यानंतर लुंबिनी स्मरणिकेचे प्रकाशन दक्षिण कोरिया येथील भिक्खू डॉलीची रॅन यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पीपल्स एजुकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. एस. पी. गायकवाड, पत्रकार वांग रिझिन हे राहणार आहेत. तर प्रमुख धम्मदेसना मराठवाड्यातील उपस्थित भिक्खू शरणानंद महाथेरो हे देतील. त्यानंतर द्वितीय सत्रामध्ये बुद्ध धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यावर जगला पाहिजे या विषयावर धम्मदेसना होईल. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता शांतीनगर येथे प्राचार्य मोहन मोरे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण, त्यानंतर दुपारी २ वाजता प्रमुख धम्मदेसना भिक्खू धम्म सेवक महाथेरो अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघ यांची होईल. द्वितीय व तृतीय सत्रामध्ये धम्मदेसना होईल. या दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, सचिव अॅड. महेंद्र गायकवाड, संयोजक भिकू पयावंश, बुद्धविहार पूर्णा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page