आनंदनगर फिडर ‘ओव्हरलोड’;गणेशोत्सवात पूर्णेकर अंधारात!
पाच दिवसांत ३० ते ४० वेळा वीज खंडित; डीपी जळणे, वाहिन्या तुटण्याच्या प्रकारांनी महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
पूर्णा, ता. १९ (प्रतिनिधी) :
शहरातील भवानी माता मंदिर ३३ केव्ही उपकेंद्रातील आनंदनगर फिडरवर तांत्रिक दृष्ट्या वाढलेल्या वीजभाराचा फटका ऐन गणेशोत्सवात नागरिकांना बसत आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून या फिडरवर वारंवार ओव्हरलोडची समस्या निर्माण होत असून, वीजवाहिन्या तुटणे, डीपी जळणे, डीओ जाणे यासह वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे मागील ५ दिवसांत तब्बल ३० ते ४० वेळा प्रत्येकी अर्धा ते दीड तास वीजपुरवठा बंद करून परमिट घेत आल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात ग्राहकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आनंदनगर फिडरअंतर्गत पूर्णा शहराची मुख्य बाजारपेठ,नवामोंढा जुनामोंढा परिसरासह सुमारे ९० टक्के वीजबिल वसुली असलेल्या उच्चभ्रू वसाहतींचा मोठा भाग येतो. गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहणे अपेक्षित असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी, घरगुती ग्राहक आणि गणेश मंडळांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे ऐन गणेशोत्सवात वारंवार अंधारात लोटल्या जाणाऱ्या पूर्णेकरांना दिलासा देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आनंदनगर फिडरवरील वाढता भार कमी करणे, आवश्यक डीपींचे फिडर पुनर्वितरण करणे, १५ एबी स्विचचा प्रभावी वापर करणे आणि ब्रेकडाऊनच्या वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तत्पर प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
२९ डीपींचा भार; फिडर पुनर्वितरणाचा प्रस्ताव धूळखात
भवानी माता मंदिर सबस्टेशनअंतर्गत ४ फिडर आहेत. त्यापैकी कोळीवाडा-७ डीपी आणि आनंदनगर फिडरद्वारे तब्बल २९ डीपींना वीजपुरवठा केला जातो. आनंदनगर फिडरवरील वाढता भार लक्षात घेऊन मराठा गल्ली, मस्तानपुरा, गवळी गल्ली तसेच अजीज नगरातील बहुतांश डीपी शेजारील कोळीवाडा फिडरवर जोडल्यास भाराचे संतुलन साधता येऊ शकते,असे जाणकारांचे मत आहे.याबाबत स्थानिक उपकार्यकारी अभियंता श्री. पांचाळ तसेच कनिष्ठ अभियंता श्री. पाटील यांच्याशी चर्चा करूनही ते प्रत्यक्ष भारविभाजनाच्या उपाययोजनेला अपेक्षित गती देत नसल्याचे चित्र आहे.
१५ एबी स्विच बसवला; तरी उपयोग काय?
आनंदनगर फिडरवरील वीजभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ अभियंता श्री.गाडेकर यांनी नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत भवानी माता मंदिर सबस्टेशनमध्ये १५ एबी स्विच बसवून दिला आहे. मात्र, उपलब्ध यंत्रणेचा अपेक्षित वापर होत नसेल तर सुविधा उभारण्याचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादावरही प्रश्नचिन्ह
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. अधिकारी व कर्मचारी फोनवर प्रतिसाद देत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. ब्रेकडाऊनच्या वेळी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त अन्य संबंधित अधिकारी-कर्मचारी वेळेत घटनास्थळी पोहोचत नसल्याने दुरुस्तीच्या कामाला विलंब होतो आणि त्याचा थेट फटका ग्राहकांना बसतो.
वसुली आधी सुरळीत वीजपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे!
आनंदनगर फिडरवरील वीजबिल वसुलीचे प्रमाण अधिक आहे.तसेच वसुलीच्या आकडेवारीचा विचार होत असल्याने या फिडरवर कमी वसुलीचा काही भाग याच फिडरला जोडल्याचे महावितरणच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.मात्र, वीजबिल वसुली चांगली असलेल्या ग्राहकांना वारंवार खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असेल, तर महावितरणने केवळ वसुलीच्या आकडेवारीपेक्षा भार व्यवस्थापन आणि ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा याला प्राधान्य देण्याची गरज आहे.











