दृष्काळग्रस्त शेतक-यांना अर्थिक मदत द्यावी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे खा.संजय(बंडु)जाधव यांची मागणी
परभणी,ता.८(प्रतिनिधी)
परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी व जालना जिल्ह्यातील अनेक भागांत मागील ३५ ते ४० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रभावित भाग दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या वाढीचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी असताना पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर केलेला मोठा खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी पणासह कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता असल्याचे खासदार जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी व जालना जिल्ह्यातील प्रभावित भाग दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पीकविमा, दुष्काळी सवलती तसेच इतर सर्व मदतीचा शेतकऱ्यांना द्यावा आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने विलंब न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे.










