अवैध बायोडिझेल साठ्यावर राज्य दक्षता पथकाची छापेमारी!
मेहकर व दुसरबीड येथे एकाच वेळी धाड; ट्रक, भूमिगत टाक्या, डिस्पेन्सर युनिटसह २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा, ता. ८ (प्रतिनिधी) :
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध बायोडिझेलच्या विक्रीला मोठा दणका देत मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे एकाच वेळी धडक कारवाई केली. या कारवाईत बायोडिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा, अशोक लेलँड कंपनीचा मालमोटार ट्रक, भूमिगत लोखंडी टाक्या, डिस्पेन्सर युनिट, पाईप व अन्य साहित्य असा तब्बल २१ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्यस्तरीय दक्षता पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. मेहकर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज बायपास रोडवरील वृंदावन लॉन्स जवळ, हॉटेल बंजारा समोरील मोकळ्या जागेत तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटसमोरील ठिकाणी अवैधरीत्या बायोडिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाची विक्री सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
राज्य दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आलेल्या या कारवाईत घटनास्थळावरील साहित्य व साठा ताब्यात घेण्यात आला. अवैध इंधनाचा हा साठा नेमका कोठून आणण्यात आला, त्यामागे कोण आहे आणि या प्रकरणाचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून, स्थानिक पोलीस व पुरवठा विभागाकडून पुढील तपास वेगाने करण्यात येत आहे. कारवाईमुळे अवैध इंधन विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या मोहिमेत राज्य दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप अंमलबजावणी गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे यांच्यासह शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, राजेश सोरते, अरुण काते, विकास नागदिवे, पवन कुंभले, रविंद्र राठोड, राजीव भेले, देवानंद थोरवे, दिपेंद्र परुळेकर, अमोल बुरटे, चंद्रकांत कांबळे, राहुल इंगळे तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी नहुशकुमार बोरोडे, शुभम फाले, पुरवठा निरीक्षक विवेक जगताप, सुनील झाल्टे व गोदाम लिपिक विशाल लोखंडे सहभागी झाले.“अवैध इंधन व गॅस तस्करीविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांनी दिला आहे.










