बारमध्ये तोडफोड करून खंजीराचा धाक; दोघांवर गुन्हा

Spread the love

बिल देण्यावरून वाद; दुकानाच्या काचा फोडून नुकसान केल्याचा आरोप- सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालताना एकाकडून खंजीर जप्त

पूर्णा, ता. ७ (प्रतिनिधी) :

बिल देण्याच्या कारणावरून वाद घालत बारमध्ये तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी तसेच सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत विना परवाना खंजीर बाळगल्या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. आयुष राजेंद्र बरकुंटे (वय २१, रा. शास्त्रीनगर, पूर्णा) आणि एका अल्पवयीन तरुणाचा यामध्ये समावेश आहे.

        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.४४ वाजता महावीर नगर परिसरातील पूर्णा वाइन्स बार अँड रेस्टॉरंट येथे बिल देण्याच्या कारणावरून संबंधित दोघांनी फिर्यादी उदय रतनलाल जैस्वाल यांच्याशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी दुकानाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले. तसेच शिवीगाळ करून आरोपी क्रमांक दोनने कमरेचा चाकू काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात BNS कलम 324(4), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, याच दोन्ही आरोपींनी त्याच रात्री सुमारे १०.३० वाजता नगर परिषद कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर        

     मोटारसायकलवरून भरधाव व बेदरकारपणे नागमोडी वळणे घेत वाहन चालवित सार्वजनिक शांतता भंग केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी दोघे अश्लील भाषेत शिवीगाळ करून आरडाओरड करत असल्याचे आढळून आले. तपासणी दरम्यान आयुष बरकुंटे याच्याकडे विनापरवाना खंजीर आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गतही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी BNS कलम 281, शस्त्र अधिनियम कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 110 व 117 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.

You cannot copy content of this page