पूर्णेच्या आय टी आयला (ITI)कृषिभूषण स्व.दादा पवार यांचे नाव

Spread the love

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नाव बदलण्यास शासनाची मंजुरी; परभणीतील ७ संस्थांचे नाव बदलले

पूर्णा/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नाव बदलण्यास मान्यता दिली असून महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने आज बुधवार दिनांक : १५ जानेवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. यात परभणी जिल्ह्यातील ७ शासकीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्यात आली असून पूर्णा येथील आयटीआयला त्याच तालुक्यातील भूमिपुत्र कृषिभूषण स्व. अॅड. गंगाधर (दादा) पवार
यांचे नाव देण्यात आले आहे.

राज्यात शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (आयटीआय) शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेतर्गत (सिटीएस ) प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा आहे. सद्यस्थितीत राज्यात ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.दि. ८ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंत्री (कौ.रो.उ. व ना.) विभाग यांची एकसदस्यीय समिती त्या जिल्हयाचे पालकमंत्री यांच्याशी विचारविनिमय करुन नावात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नाव बदलण्यास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. यात परभणी जिल्ह्यातील पुढील संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. संत मोतीराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालम, कृषिभूषण स्व. अॅड. गंगाधर (दादा) पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्णा, दिव्यचैतन्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मानवत, गोंधळमहर्षी राजारामबापू कदम, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी,
स्वातंत्र्य सैनिक दिगंबरराव चौधरी भारस्वाडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरी,
महर्षी वाल्मिकी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेलू, जि. परभणी,  मच्छिंद्रनाथ महाराज  औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोनपेठ जि. परभणी अशा 7 आयटीआयचा समावेश आहे.
     पूर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला कृषिभूषण स्व.दादा पवार यांचे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. ही आनंद वार्ता समजताच त्यांचे गाव असलेल्या वझुर येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तसेच शेती सेवा ग्रुप आणि पूर्णा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनाच्या वतीने शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले

You cannot copy content of this page