राष्ट्रीय मतदान दिन; पूर्णेत आयोगाकडून विविध स्पर्धांचे आयोजन…
२५ जानेवारीला सामुहिक प्रतिज्ञा-तहसिलदार बोथिकर यांची माहिती
पूर्णा/प्रतिनिधी
राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त पूर्णा शहर व तालुक्यात निवडणूक विभागाने दि.२२ ते २४ जानेवारी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले असून राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त येथिल जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या सामुहिक प्रतिज्ञा घेतली जाणार असल्याची माहिती पूर्णा तालुका निवडणुक अधिकारी तहसिलदार माधवराव बोथिकर यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी, १९५० रोजी झाली.आयोगाच्या वतीने हा दिवस स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो.पूर्णा शहरात व तालुक्यातील विभागाने राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यासाठी तहसिलदार माधवराव बोथिकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर,ना.त.मस्के,ना.त.शिंदे निवडणुक विभाग प्रमुख जजरवार अरविंद पंडीत आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तहसीलदार बोथिकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,मतदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करुन घेण्यासाठी, प्रत्येक निवडणूकीत मतदान करवून व लोकशाहीवर जनतेची निष्ठा ठेवण्यासाठी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त शपथ घेण्याचा कार्यक्रमासह वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन दि.२२ ते २४ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.त्यामध्ये इयत्ता ६ ते ९ व इयत्ता ९ ते १२ साठी निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा विद्या प्रसारणी सभेचे हायस्कुल, पूर्णा येथे २२ रोजी स.११ वाजता तर चित्रकला स्पर्धा अभिनव विद्या विहार, पूर्णा येथे २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तर श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयात २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वृकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.तर दि.२५ रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मैदानावर सामुहिक प्रतिज्ञा घेतली जाणार असुन या स्पर्धेत कार्यक्रमात शहर व तालुक्यातील विद्यार्थी नवमतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार बोथिकर यांनी केले आहे.
.












