पूर्णेतील गौर शिवारात हिंस्त्र प्राण्याचा वावर!

Spread the love

बिबट्या असल्याची शेतमालकाची माहिती;परिसरात खळबळ

पुर्णा / प्रतिनिधी :

तालुक्यातील गोविंदपुर गावाजवळ असलेल्या लोहमार्ग परिसरातील गौर शिवारात शुक्रवारी (ता.१०) रोजी मध्यरात्री हिंस्त्र प्राण्याचा वावर आढळल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ,नांदेड-पूर्णा लोहमार्गालगत असलेल्या गट क्रमांक ५३२ मधील केशवराव पारवे यांच्या शेतात शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शेतात तुरीला पाणी देत असताना बॅटरीच्या प्रकाशात बिबट्याच दिसला असल्याचे त्यांनी सांगितले.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गौर येथील शेतकरी शिवानंद केशवराव पारवे हे वडील केशवराव यांच्यासोबत रात्रीच्या वेळी तुरीच्या पिकाला पाणी देत होते. याचदरम्यान बॅटरीचा प्रकाश शेतात टाकला असता त्यांना समोर एक हिंस्त्र प्राण्यासारखा दिसला. शेतमालकांच्या माहितीनुसार, तो बिबट्या होता. अचानक समोर आलेल्या या प्राण्यामुळे दोघेही प्रचंड घाबरले. शिवानंद यांनी तातडीने वडिलांना जागे केले. त्यानंतर जीव मुठीत धरून दोघांनीही तेथून धाव घेत जवळच असलेल्या बंद पत्र्याच्या शेडवर आश्रय घेतला. या प्रसंगात मोठ्या धैर्याने त्यांनी स्वतःचा बचाव केला. घटनेनंतर शेतामध्ये मोठ्या आकाराचे पायांचे ठसे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतात नेमका कोणता प्राणी आला होता, याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. शेतमालकांनी बिबट्या असल्याची माहिती दिल्याने नागरिकांमध्ये भीती अधिकच वाढली आहे. मात्र, प्राण्याची अधिकृत ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून वनविभागाच्या पाहणीनंतरच याबाबत निश्चित माहिती समोर येऊ शकते.

रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात! महावितरणकडून शेतीच्या सिंचनासाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना तूर, हळद, कापूस यांसारख्या पिकांना पाणी देण्यासाठी मध्यरात्री शेतात जावे लागत आहे. दिवसा वीज उपलब्ध नसल्याने रात्रीच्या अंधारात पिकांची निगा राखण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. अशातच हिंस्त्र प्राण्याचा वावर समोर आल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा

गौर शिवारातील या घटनेची वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पाहणी करावी, आढळलेल्या ठशांची तपासणी करून प्राण्याची ओळख निश्चित करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात आता भीतीचे सावट पसरले असून, प्रशासन याकडे किती तत्परतेने लक्ष देते, याकडे गौर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page