एटीएमच्या हार्डडिस्क चोरीचा दोन तासांत उलगडा

Spread the love

परभणी पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी;तिघे ताब्यात;दुचाकी सह ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

परभणी/प्रतिनिधी
शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन एटीएममधून हार्डडिस्क काढून चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व नानलपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गुरूवारी(ता.८) रोजी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ३ लाख २ हजाक १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परभणी शहरातील भिकुलाल पेट्रोल पंप, कांतीचौक परिसर आणि महात्मा फुले कॉलनी परिसरातील भारतीय स्टेट बँक शाखेच्या तीन एटीएममधून हार्डडिस्क काढून चोरी झाल्याची माहिती गुरूवारी पहाटे २ ते ६ वाजण्याच्या दरम्यान पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व नानलपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अवघ्या दोन तासांत आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी तयार केलेले विशेष पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले. तसेच तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी नानलपेठ पोलिसांत भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत, आरोपी सचिन उदय यादव(वय २३)रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ जालना, प्रफुल्ल शंकर सोनवणे(वय २२)रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ जालना, विशाल धाकतोडे(वय २०)रा. मुकुंदवाडी, गल्ली क्र.७, छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून ४ टीबी क्षमतेच्या तीन हार्डडिस्क, बुलेट मोटारसायकल क्र. एमएच २० एचपी ०६७२, रेडमी मोबाईल फोन, सिम नसलेला पोको मोबाईल फोन, दोन स्क्रूड्रायव्हर, काळ्या रंगाची सॅक बॅग असा एकूण ३ लाख २ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधिक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनात स्था.गु. शाखेचे पो.नि. गजेंद्र सरोदे आणि नानलपेठ पोलिस ठाण्याचे पो.नि. विलास घोबाडे यांच्या नेतृत्वात सपोनि. सय्यद, फौजदार गणेश सवंडकर, पोहेकाॅ. महेश पांगरकर, नेताजी गित्ते, अंमलदार प्रमोद पुरी, ईशाद शेख, संतोष सानप व विनोद चव्हाण यांनी मिळून केली.

You cannot copy content of this page